
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक


पृथ्वीवर असलेल्या दळणवळणाच्या सर्व साधनाचा वापर अंदमान टूर मध्ये झालेला आहे.नांदेड हैद्राबाद नांदेड रेल्वे प्रवास,हैद्राबाद श्री विजयपुरम हैद्राबाद विमान प्रवास,श्री विजयपुरम इतर बेटांना जातायेतांना केलेला क्रुझ, स्टिमर,स्पीड बोटचा प्रवास,बारतांग ला जाता येताना केलेला रस्त्याचा वापर,समुद्रातील जीवन सृष्टी पाहण्यासाठी पाण्याखालून सब मरीन ने मारलेला फेरफटका आणि चुनखडी च्या गुहा पाहण्यासाठी जंगलात केलेली अडीच किलोमीटर ची पायपिट यामुळे जल, भूमी,आकाश या तिन्ही ठिकाणी विहार झालेला आहे. रात्री दोन वाजता वेक अप कॉल ने उठल्या नंतर एका तासात सर्व जण तय्यार झाले.ब्रेकफास्ट ची पार्सल ची सुविधा उपलब्ध होती.तीन वाजता आम्ही चार एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने बारातंग कडे कूच केली.५० किमी अंतर दीड तासात पूर्ण करून जिकराम चेक पोस्ट ला पोंहचलो.सर्व वाहने रांगेत लावण्यात येत होती.येथून पुढचा प्रवास जारवा आदिवासी जंगलातून जाणार असल्यामुळे पोलीस ताफ्यात जावे लागते.आधार कार्ड सहित नावाची लिस्ट व इतर फॉर्मालिटी पूर्ण केल्या.पहाटे सहा वाजता कानव्हे सुटणार असल्यामुळे बराच वेळ शिल्लक होता. टपरी वर गरमागरम चहा कॉफी चा आस्वाद घेतला.काहींनी बाजूला असलेल्या मंदिरात जावून गणपती व दुर्गेचे दर्शन घेतले.

बरोबर सहा वाजता शंभर च्या वर वाहनाचा ताफा पोलीस बंदोबस्तात सुसाट निघाला. घनदाट जंगलात आणखी ५५ किलोमिटर चे अंतर पुर्ण करायचे होते.जारवा आदिवासी पाहण्याची उत्सुकता अतिशय तीव्र होती.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशा मुळे या भागात आदिवासींचे फोटो काढण्यास सक्त मनाई होती.अर्धे अंतर पूर्ण झाले तरी आदिवासी काही दिसेचनात.त्यामुळे निराशा वाढत होती.वाहन चालक गोपाल आश्वत करत होता की,जंगली जारवा आदिवासी जरूर दिसतील.पण जंगल संपत असल्यामुळे आमचा धीर सुटत चालला होता.तेवढ्यात ड्रायव्हर जोरात ओरडला.आम्ही उत्सुकते पोटी समोर पाहिले.तोंडाला पांढरा रंग फासलेली तीन जारवा आदिवासी मुले रस्त्याच्या कडेला फक्त चड्डीवर बसलेली होती.ड्रायव्हरला गाडी स्लो करण्यास सांगितली.पण त्याने नकार दिला.गाडी मुद्दाम थांबविली तर ५००० रुपये दंड व एक महिन्यासाठी सिज करण्यात येते असे त्यांने सांगितल्यामुळे आम्ही फोर्स केला नाही.मिडलस्टेट जेट्टी वर पोहचल्यानंतर आम्ही टेंपो ट्रॅव्हल मधून खाली उतरलो. मोठ्या स्टीमर मधून आम्ही बारतांग ला जाण्यासाठी निघालो.या मोठ्या बोटीत प्रवाशांची व वाहनांची गर्दी होती.तेवढ्यात माझे लक्ष किनाऱ्याकडे गेले.दोन छोट्या होडीतून प्रत्येकी तीन तीन जारवा आदिवासी शिकारी साठी जात होते.ही माहिती सर्वांना दिली.आदिवासी जंगली माणसांना स्पष्टपणे पाहता आल्यामुळे सर्वांचे समाधान झाले.


मिडल स्टेट ते बारतांगला समुद्रातून जाण्यासाठी १५ मिनिटे लागली.१० जणांचे सहा ग्रुप करून अल्फा, बीटा, चार्ली,डेल्टा, इको, फॉक्सट्रोक असे नाव दिले.प्रत्येक ग्रुप च्या कॅप्टन वर सर्वांना एकत्रीत ठेवण्याची जबाबदारी दिली. येथून पुढचा आमचा प्रवास होणार होता स्पीड बोट ने. टेन प्लस टू ची कॅपॅसिटी असलेल्या या स्पीड बोट ने अवघ्या पंधरा मिनिटात ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापले. समुद्राच्या दोन्ही बाजूने असलेल्या गर्द झाडीतून स्पीड बोटने शेवटचे एका किलोमीटरचे अंतर पूर्ण करताना अतिशय मजा आली.लाकडी स्टॅन्ड ला आम्ही बोटीतून उतरलो. येथून बाराशे मीटर अंतर पायी चालावे लागते. घनदाट वनात केलेली पाऊलवाटेवरून जाताना आजूबाजूला झाडावर असलेल्या पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. एखाद्या वनात सहलीला आल्यासारखे वाटत होते.जगप्रसिद्ध असलेली चुनखडी गुहा पाहिल्यानंतर चालल्यानंतर आलेल्या श्रमाचे काहीच वाटले नाही. निसर्गनिर्मित अंधाऱ्या गुहेत प्रवेश करताना थोडी भीती वाटते.

गाईडच्या बॅटरीचा प्रकाशात निसर्गाच्या किमयेची प्रचिती येते.आपोआपच तयार झालेल्या या कलाकृतीमध्ये गणपती,हत्ती, शंख, गदा यासारख्या असंख्य वस्तू दिसतात. अशा प्रकारची अनोखी गुहा मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे. अर्ध्या तासानंतर या स्वप्ननगरीतून बाहेर आलो. लिंबू सरबत घेऊन परत पायी चालणे सुरू केले. त्यानंतर स्पीड बोटने आम्ही बारतंग ला पोहोचलो. इथून टाटा सुमो करून भारतातील एकमेव चिखल ज्वालामुखीच्या ठिकाणी गेलो.थोडे चालून टेकडीवर गेलो असता थंड ज्वालामुखी दिसला. हे मातीचे ज्वालामुखी तुरळकपणे उद्रेक झालेले आहेत. स्थानिक लोक याला जलकी म्हणतात .नारकोंडम ज्वालामुखी ज्याला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने सुप्त ज्वालामुखी म्हणून वर्गीकृत केले आहे.जेवणाची वेळ झाली असल्यामुळे बारतंगलाच हॉटेलमध्ये साधे जेवण केले. कमी मालमसाला वापरून तयार केलेले पदार्थ चविष्ट होते.
जेवल्यानंत परतीच्या प्रवासासाठी मोठी बोट येईपर्यंत जेटीवरच थांबावे लागले. पंधरा मिनिटांची समुद्री सफर करून आम्ही पोलिसांच्या ताफ्यात परतीचा प्रवास सुरू केला. जंगलात बराच वेळ वाट पाहून देखील रस्त्यात कुठेही आदिवासी दिसले नाहीत. मोबाईलची रेंज आल्यानंतर माझ्या गुगल पे वर वीस हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. अमरनाथ यात्रेकरू आनंद साताळे यांनी आगामी अंदमान टूरसाठी दोन व्यक्तींचे आडवांस बुकिंग पाठवले होते. जानेवारी २०२५ मध्ये दुसरा अंदमान टूर काढण्याचा नुसता सुतोवाच या लेखमालेतून केला होता. सहलीची निश्चित तारीख ही पक्की झाली नव्हती तसेच अंदमान टूरचे पोम्प्लेट देखील काढले नव्हते. तरीदेखील दोन बुकिंग झाल्याचे पाहून सर्वजण चकित झाले. हा एक शुभ संकेतच मानावा लागेल. रात्री सातच्या सुमारास आम्ही हॉटेलला परतलो. दिवसभराच्या दगदगीमुळे आलेला शिन गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केल्यामुळे निघून गेला. फ्रेश होऊन रात्रीच्या भोजनात असलेल्या खिचडी,कडी,भजे, मालपोहा सह बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद येऊन झोपी गेलो. (क्रमशः)



