“श्रद्धा, राष्ट्रभक्ती आणि निःस्वार्थ सेवेचं उत्कट दर्शन!”
माता वैष्णोदेवीचे यशस्वी दर्शन झाल्यानंतर सर्वजण भावनांनी ओथंबलेले! हॉटेल ‘श्रीन ग्रँड’मधील आरामदायी वास्तव्यानंतर सकाळी ८ वाजता आम्ही आमच्या बसने जम्मूकडे रवाना झालो.अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या शार्दूल वडजकर या तरुण इंजिनियरची सुट्टी संपत आल्यामुळे त्याला निरोप द्यावा लागला. प्रवास सुरू झाल्यावर लगेचच वसुबेन पटेल आणि शंकर मोरलवार यांनी घेतलेल्या तंबोला गेममुळे एक तास कसा गेला, ते कळलेच नाही. त्यात रोख बक्षिसेही होती.


जम्मू बायपासवर दरवर्षीप्रमाणे आम्हाला प्रेमळ निमंत्रण देणारे मूळचे नांदेडचे, पण आता जम्मूत स्थायिक झालेले लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानोबा जोगदंड यांनी दिलेल्या गरमागरम दाल-चावल आणि तुपातला शिरा यांचा आस्वाद घेतला. फक्त २१ व्या वर्षी घरची गरिबी दूर करण्यासाठी कामगार म्हणून आलेल्या जोगदंड यांनी आपल्या कष्टातून आज १८०० मजुरांचा एक संघ तयार केला आहे. त्यांच्या या कर्तृत्वाचा आम्ही सत्कार केला.


जम्मू दर्शनाची सुरुवात, काली माता मंदिर
शहरात दिवसा मोठ्या बसना प्रवेश नसल्याने आधीच बुक केलेल्या चार मॅटाडोरने आमच्या जम्मू दर्शनाची सुरुवात झाली. पहिले ठिकाण होते – काली माता मंदिर. हे मंदिर तावी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘बहू’ किल्ल्यावर आहे. राजा बहू लोचनने सुमारे ३३० वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला आजही अस्तित्वात आहे, हे विशेष.पूर्वी येथे बोकड बलिदान दिले जात होते, ती प्रथा आता थांबविण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये ‘बहू मेला’ मोठ्या उत्साहात भरतो. मंगळवार आणि रविवारचे विशेष पूजन, मंदिरातील माकडांची संख्या, आणि पांढऱ्या संगमरवरी चबुतऱ्यावरची काळ्या पाषाणातील मूर्ती, या साऱ्या गोष्टींनी मन प्रसन्न झाले.


हर की पौडी, विविध देवतांचे एकत्र दर्शन
यानंतर आम्ही पोहोचलो हर की पौडी मंदिरात, जे तावी नदीच्या काठी वसलेले आहे. तीन भागात विभागलेल्या या मंदिरात:पहिल्या भागात गणेशाची भव्य मूर्ती, दुसऱ्या भागात चामुंडा देवी, चित्रगुप्त, संतोषी माता, सरस्वती, अन्नपूर्णा आणि शिवमूर्ती.तिसऱ्या भागात भगवान विष्णू आणि नाग-नागिणीच्या देखण्या मूर्ती या विविध मूर्तींनी मनाला भारावून टाकलं.

अमरनाथ लंगर, जेवण आणि सेवा
दुपारी दोनच्या सुमारास आम्ही कुंजवानी चौकातील अमरनाथ लंगर येथे जेवणासाठी पोहोचलो. कॅप्टन काला चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनापासून सेवा केली. त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला. त्यानंतर रघुनाथ मंदिराजवळ असलेल्या एम. के.हॉटेल, चार चिनार हॉटेल, लॉग इन हॉटेल या तीन हॉटेल्समध्ये मुक्काम केला. जम्मूचा उकाडा टाळण्यासाठी एसी रूम्सचा दिलासा लाभला.
रघुनाथ मंदिर, इतिहास, श्रद्धा आणि सुरक्षितता
संध्याकाळी आम्ही रघुनाथ मंदिराला भेट दिली. २४ नोव्हेंबर २००२ रोजी येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला होता. पण त्यानंतर भाविकांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढलेलीच आहे. एअरपोर्टसारखी कडक सुरक्षा तपासणी झाल्यावर आम्हाला आत प्रवेश मिळाला. हे मंदिर महाराजा गुलाबसिंह आणि रणबीरसिंह यांच्या शासनकाळात (१८५३-१८६०) उभारले गेले. ३०० हून अधिक देवतांच्या मूर्ती असल्या तरी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूळ मूर्तींमुळे याला ‘रघुनाथ मंदिर’ म्हणतात.
इथे स्पटीक व शालिग्राम पासून बनवलेल्या शिवपिंड्या, २१ मंदिरे, सोन्याच्या पत्र्याचे गाभारे, रामायण-महाभारताच्या चित्रकथा आणि एक ६००० हून अधिक ग्रंथांचे वाचनालय पाहताना वेळ कमी पडतो. शांत, सात्विक दर्शनानंतर हॉटेलच्या थंडगार रूममध्ये विसावल्यावर सहज झोप लागली… (क्रमशः)


