हदगाव, शेख चांदपाशा| भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अखेर ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतल्याचे चित्र होते. भाजपात त्यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असताना, गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यानंतर मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले.


हदगाव हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात माजी आ.जवळगावकर यांचा भाजप प्रवेश अमित शहा यांच्या उपस्थितीत “शंखनाद” मेळाव्यात होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्यांनी अनेक राजकीय जाणकाराचे अंदाज चुकविले प्रत्यक्षात त्यांनी भाजपात प्रवेश न करता आयोजित काँग्रेसच्या तिरंगा रॅलीत सहभागी होत “मी काँग्रेस मध्येच आहे” असा स्पष्ट संदेश दिला. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणं रचली गेली होती. अनेकांच अंदाज चुकला.

विशेषतः हदगाव विधान सभाक्षेत्राचे विद्यमान आ.बाबुराव कदम कोहीळकर यांना शह देण्याचा भाजपचा डाव असल्याचंही बोललं जात होत. कारण माजी आमदार जवळगावकर हे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे, विश्वासू मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिक बलवत्तर वाटत होती.

याच दरम्यान, मुलीच्या विवाह कार्यामुळे राजकीय गप्पांतून काहीसे अज्ञात झालेल्या जवळगावकरांनी वैयक्तिक कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर पुन्हा हदगांव – हिमायनगर मतदार संघात सक्रिय होण्यास सुरुवात केली. तालुक्यात अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबांना भेट देणे असो, किंवा कार्यकर्त्यांच्या शुभकार्यात सहभाग त्यांनी आपल्या कार्यशैलीतून “मै तयार हूँ” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

खा. अशोक चव्हाण यांचा राजकीय निशाणा चुकला तर नव्हे…!
माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे खासदार असलेले अशोक चव्हाणाच्या खास मर्जीतील माजी आ. माधवराव पा. जवळगावकर मानले जातात. खासदार आशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर माजी आ. माधवराव पा. जवळगावकर कडून कोणतीही टीका न झाल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता दिसून येत होती. मात्र माजी आ.जवळगावकरांनी काँग्रेसचाच झेंडा हाती ठेवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. काही प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेच्या( शिंदे गटात) सामील झाले, तर काही जण अणखीन ही काँग्रेसमध्येच कार्यरत आहेत. त्यामुळे जवळगावकरांच्या भवितव्या बाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
ह्या दरम्यान, त्यांनी त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यां मार्फत त्यांनी मतदारसंघात चाचपणीही केल्याचे समजते. या चाचपणीत, भाजपात गेल्यास त्यांचा पारंपरिक मतदार व समर्थक वर्ग दुरावण्याची शक्यता चाचपाणीत स्पष्ट झाले होते. केवळ त्यांचा नव्हे, तर काँग्रेसचा मतदार त्याचे चाहते गमावण्याची भीती निर्माण झाली होती हे लक्षात घेत कदाचित त्यांनी निर्णय बदला असावा. आज घडीला नांदेड जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा असून, खा. अशोक चव्हाण हे भाजपच्या प्रमुख नेतृत्वात अग्रस्थानी आहेत. त्यांच्या निकटवर्तीयां पैकी असलेले कॉंग्रेसचे माजी आ. जवळगावकर हे भाजपात येतील अशी खात्री अनेकांना होती. मात्र जवळगावकरांच्या या ‘राजकीय चकमा’ मुळे खा. अशोक चव्हाण यांचाच निशाणा चुकला का अशी चर्चा आता जिल्ह्याभर रंगू लागली आहे.