नांदेड| नेरली येथील नागरिकांनी पाण्याच्या टाकीतील दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना विषबाधा झाली होती. हे रुग्ण वेगवेगळ्या रूग्णालयात दाखल असून माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व योग्य ते उपचार करण्याच्या आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या.


दि.27 च्या मध्यरात्रीपासून नेरली येथील अनेक नागरिकांना उलट्या, संडासचा त्रास सुरू झाला होता. ज्यांनी टाकीपासून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी पिले त्यांनाच हा त्रास जाणवू लागला. गावातील सुमारे 500 पेक्षा जास्त नागरिकांना दूषीत पाण्याची बाधा झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलत रुग्णांना डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील कांही रुग्ण अतिगंभीर असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबईवरून नांदेड येथे येताच माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सर्व रूग्णांवर सुरु असलेल्या उपचाराबद्दल समाधान व्यक्त करतांनाच औषधी व इतर सुविधांची संबंधीत आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अंकिता देशमुख, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख, अधिक्षक डॉ.वाय.एच. चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती.
