मुंबई/नांदेड, अनिल मादसवार | नांदेड जिल्ह्यातील हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करून तातडीने सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


इसापूर धरणाचे तब्बल १३ दरवाजे उघडल्यामुळे, तसेच हदगाव तालुक्यात १५८ मि.मी. व हिमायतनगर तालुक्यात तब्बल २३२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आणि ओढे-नाल्यालगतच्या शेतजमिनींमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. विशेषतः ऊस, सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.


आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मांडलेल्या ठळक मागण्या मध्ये प्रत्येक महसूल मंडळात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद असल्याने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे १००% नुकसान गृहीत धरून पंचनामे करण्यात यावेत. नागरिकांची घरे कोसळली व घरातील जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांना तातडीची मदत देण्यात यावी. शेतकरी व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.



या संदर्भात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना पत्राद्वारे माहिती सादर केली. महापुरामुळे मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल तसेच ग्रामीण रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी आमदार कोहळीकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनाही मागणीपत्र सादर केले आहे.


यापूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी हदगांव विधानसभा मतदार संघात प्रत्यक्ष दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला होता. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागास तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.


