हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यात हिवाळ्याची तीव्रता वाढल्याने परिसरात कडाक्याची थंडी जाणवत असली, तरी रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी शेतात अहोरात्र मेहनत घेत आहेत. तापमानात मोठी घट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.


थंडीमुळे पिकांवर दव पडून वाढ खुंटू नये, तसेच ओलावा टिकून राहावा यासाठी अनेक शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले जात आहे.

कडाक्याच्या थंडीतही पहाटे व रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी दिवसा विजपुरवठा करावा अशी मागणी होते आहे.


महागाईच्या काळात खर्चात वाढ होत असतानाही पीक सुरक्षित राहावे, उत्पादनात घट येऊ नये यासाठी शेतकरी ही उपाययोजना करत आहेत. थंडीचे दिवस आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शासनाकडून मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आला होता. आत्ता खरीपात झालेले नुकसान रब्बी पिकातून भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांची जमीन खारीपातील अति पावसामुळे रान तयार व्हायला उशीर झाल्याने आता कुठे गहू, हरभरा व इतर रब्बी पीक बहरू लागली असून, पिकांना वाचविण्यासाठी स्प्रिंकलर द्वारे पाणी देऊन उत्पादन घेण्यासाठी शेतकरी धडपडत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
