हिमायतनगर। धानोरा शिवारात शुक्रवारी दुपारी शेतातील कापूस वखरत असतांना जूंपून असलेल्या एका बैलास विद्युत ताराचा स्पर्श झाला यामध्ये बैल जागीच ठार झाला तर दुसऱ्या बैलास दुखापत झाली असून सालगडी गंभीर झाला आहे . (Farmer’s bull killed by falling electric wire Incident in Dhanora) महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तारा लोंबकळत असल्याची माहिती देऊन देखील दुर्लक्ष केले असल्यामुळे शेतकऱ्यांचा. बैल ऐन पेरणीच्या मोसमात दगावला असल्याने मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने तातडीने मदतकार्य करावे अशी मागणी केली आहे.


तालुक्यातील धानोरा ज.येथील शेतकरी अर्पीत मुन्नालाल जैस्वाल यांच्या शेतात गट क्रमांक 204 मध्ये शुक्रवारी शेतातील काम करीत असताना अचानक गावठाण असलेल्या शामराव डि.पी वरचा मुख्य आर्तिंग चा तार खाली पडला या तारांवर बैलाचा पाय बसताच जागीच बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन शेतकरी मात्र बालंबाल बचावले आहेत.धानोरा शिवारासह पंचक्रोशीतील विद्युत पोलवरील तारा गेल्या पंचवीस वर्षांपासून दुरूस्ती केली नसल्यामुळे या शिवारातील तारा लोंबकाळल्या असल्याने धोका निर्माण झाला आहे.

वादळी वाऱ्यामुळे शिवारातील तारा लोंबकळत असलेल्या तारा अचानक जमिनीवर कोसळत आहेत.त्यामुळे जनावरासह मनुष्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.महावितरणच्या अभियंता आणि ठेकेदाराने तारा उन्हाळ्यात दुरूस्ती करायला पाहिजे होत्या परंतु धानोरा,कारला, बोरगडी, सिबदरा, वडगाव ज, मंगरूळ,खैरगाव या भागातील विद्युत तारांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरूस्ती केली नसल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन जिवीतहानीच्या घटना घडत आहेत. या भागातील गावकऱ्यांनी अनेकदा महावितरणच्या अभियंत्यासह वायरमन यांना कल्पना देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या भागातील जिर्ण झालेल्या विद्युत तारा अद्यापही लोंबकळत आहेत.

धानोरा येथील शेतकऱ्यांचा एक बैल दगावला असल्याने जवळपास पन्नास हजार रुपये नुकसान झाले असुन सदरील घटनेचा पंचनामा जायमोक्यावर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केला यावेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते .ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असुन .महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्युत तारा दुरूस्ती कराव्यात अशी मागणी संचालक नितेश जैस्वाल यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
