नांदेड| राज्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गायीच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति पशु 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी 5 जानेवारी 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थानी www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर 5 जानेवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुधारित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यासाठी 16 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 कालावधी दिला आहे. गोसेवा आयोगामार्फत प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे.
जिल्हा गोशाळा पडताळणी समितीद्वारा प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी 11 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी समिती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या आयोग कार्यालयास 21 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत कळविण्यात येणार आहे.
नांदेडमध्ये 6 जानेवारीला लोकशाही दिन
नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आपल्या तक्रारीसह उपस्थित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाकडे लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर येथे उपस्थित राहतील. निवेदन नोंदणीची सुरूवात दुपारी 12 वा. होणार आहे. त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी दुपारी 1 ते 3 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.