श्रीक्षेत्र माहुर l माहुर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी या महामार्गावरील पथदिवे बंद असणे,सर्व्हिस रोड लगत पेवर ब्लॉक न बसविणे आदी बाबींमुळे शहरातील नागरिकांसह भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशी व्यथा डॉ. पद्माकर जगताप यांनी दि. १६ फेब्रु. रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या संकेतस्थळावर मांडली होती.ना.गडकरी यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता नांदेड यांना दि.७ मार्च रोजी उचित उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केले आहे.


डॉ. पद्माकर जगताप यांनी माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील सिसी रस्ता,नाली,सर्व्हिस रोड व दुभाजकाचे काम सुमारे दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले असल्याचे वास्तव मांडले आहे.तसेच दुभाजकावर सुमारे दहा महिन्यापूर्वी विद्युत खांब उभारून त्यावर पथदिवे बसविण्यात आले.परंतु ते सुरु झाले नसल्याने महामार्गांवर रात्रीला अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते असा उल्लेख केला आहे.

याशिवाय सर्व्हिस रोड लगत पेवर ब्लॉक बसविले नसल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असल्याने कधी अनुचित प्रकार घडेल याची शास्वती देता येत नसल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या विनंतीची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे सुचविल्याने महामार्गवरील रेंगाळलेलेले काम पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
