देगलूर, गंगाधर मठवाले| रात्रीच्या वेळी बालरुग्णांना उपचार न मिळण्याच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी आज देगलूरमध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार जितेश अंतापुरकर यांच्या पुढाकाराने आणि अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रशासन, खासगी डॉक्टर आणि पोलीस विभाग यांच्यात सकारात्मक निर्णय घेण्यात आला.


गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी खासगी रुग्णालयांत बालरुग्णांच्या उपचारात अडचणी निर्माण होत होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार अंतापुरकर यांनी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना सूचना करून तातडीची बैठक बोलावली. बैठकीत ठरले की आठवड्यातील पाच दिवस खासगी बालरोग तज्ज्ञ सेवा देतील, तर उर्वरित दोन दिवस उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदारी पार पाडतील. डॉ. थडके, डॉ. चित्तलवार, डॉ. कस्तुरे, डॉ. रमेश रेखावार आणि डॉ. आनंद जाधव हे पाच दिवस रुग्णसेवा देतील.


त्या दिवशी सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडेच रुग्णांनी उपचारासाठी जावे, तसेच सुरक्षेसाठी संबंधित रुग्णालयाला पोलीस संरक्षण दिले जाईल, अशी सूचना आमदार अंतापुरकर यांनी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनीही या निर्णयाची पुष्टी केली. खासगी डॉक्टरांनी या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, तातडीने नियोजन राबवण्याच्या सूचनाही आमदार अंतापुरकर यांनी दिल्या आहेत. हा निर्णय देगलूर शहरातील आरोग्य व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून मत व्यक्त होत आहे.


आठवड्याचे रुग्णालय वेळापत्रक — रात्री सेवा देणारे बालरोगतज्ञ
वार रुग्णालयाचे नाव डॉक्टरांचे नाव
सोमवार थडके बाल रुग्णालय डॉ. थडके
मंगळवार साई गणेश बाल रुग्णालय डॉ. कस्तुरे
बुधवार रेखावार हॉस्पिटल डॉ. रमेश रेखावार
गुरूवार हाळीकर हॉस्पिटल डॉ. आनंद जाधव
शुक्रवार चिंतलवार हॉस्पिटल डॉ. चित्तलवार
शनिवार उप जिल्हा रुग्णालय बालरोग तज्ञ (सरकारी)
रविवार उप जिल्हा रुग्णालय बालरोग तज्ञ (सरकारी)



