नांदेड। जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 19 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसुल प्रबोधनी (प्रशिक्षण केंद्र) एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे आयोजित केला आहे.


शासन निर्णय 4 मार्च 2013 नुसार राज्यात सर्व जिल्हयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येतो. जर या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस, महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल असे आदेशित केले आहे.


संबंधित समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थीत रहावे. तसेच समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहीत नमुन्यात सादर करावेत. असे आवाहन महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड जिल्ह्यात 31 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात दि. 17 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 31 मे 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
खाजगी आस्थापनांमध्ये तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक
नांदेड कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 (POSH Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013 मधील कलम 4 अन्वये ज्या कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच याअंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शे बॉक्स पोर्टलवर नोंदणी करण्याची कार्यपद्धती याप्रमाणे https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती नोंदवा. Private Head Office Registration करुन आवश्यक त्या माहितीचा तपशील भरुन सबमिट या टॅबवर क्लिक करुन अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल. तरी सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले आहे.


