नांदेड, अनिल मादसवार। इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतून विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत २.५० ‘दलघमी’ पाणी सोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे सूचना केल्या असून, तसा अध्यादेश काढला आहे. लवकरच इसापूर प्रकल्पातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने हदगाव-हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा ममिळणार आहे.
हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून लोकनेते तथा नेहमी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांना जनतेनी मोठया अपेक्षेने विधानसभेत पाठविले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या नागपूर येथील अधिवेशनात आमदार कोहळीकर यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत आवाज उठविला आहे. तसेच मतदार संघातील जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते धडपडत असल्याचे समाधान नागरिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेवर आपल्या कार्याची वचक निर्माण करून जनहिताचे कार्यासाठी प्रथम प्राधान्य देत आहेत. दाखवण्यास सुरवात केली आहे. डिसेंबर महिना संपत असताना पैनगंगा नदी कोरडी पडू लागल्याने यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना हिवाळ्यातच बंद पडतात की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. नदीपात्रात पाणीच नसल्याने शेतकऱ्यांचे पशुधन आणि वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडणे किती आवश्यक आहे हे आमदार कोहळीकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी पत्र दिले.
२०२४, २०२५ चे पाणी आरक्षण १७.२४ ‘दलघमी’ असून, या पैकी २.५० दलघमी पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडल्यानंतर १४.७४ ‘दलघमी’ पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक राहणार आहे. पैनगंगेत पाणी सोडल्यानंतर हदगाव तालुक्यातील बेलमंडळ, इरापूर, करोडी, पेवा, उंचेगाव खु., साप्ती, हरडफ, मनूला, गुरफळी, बाभळी, मनूला बु., गोजेगाव, वाकोडा, बेलगव्हाण, कोथळा, वाकी म., मनूला खू., उंचेगाव, शिरूर, माटाळा, भानेगाव आदी तर हिमायतनगर तालुक्यातील घारापूर, मंगरूळ, डोल्हारी, पळसपूर, कौठा ज., एकंबा, वारंगटाकळी, दिघी, शिरपल्ली, शेल्लोडा, कामारी, बोरगडी, धानोरा ज. आदी गावांना थेट फायदा होणार आहे. याबद्दल आमदार बाबूराव कदम कोहळीकरांचे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी आभार मानले आहेत.