नांदेड| हाडं गोठवणार्या कडाक्याच्या थंडीत धरतीचे अंथरुण आणि आभाळाचे पांघरुण करुन उघड्यावर रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, स्टेशनवर, पुलाखाली बेवारस भूकेली उपाशीपोटी झोपलेली माणसं बघितल्यावर प्रत्येक संवेदनशिल मनाच्या माणसाच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही. कारण कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण गरम आणि उबदार स्वेटर, मफलर, टोपी, हातमोजे, पायमोजे इ. आयुधे वापरुन सुद्धा थंडीचा कडाका जाणवतोच, तर ही आपल्यासारखीच असणारी पण समाजातील गरीब, वंचित, उपेक्षित दुर्लक्षित माणसे फाटक्या -तुटक्या, जुन्या व जिर्ण झालेल्या अपुर्या अंथरुण व पांघरुणामध्ये कसे झोपत असतील? हा प्रश्न बालमित्र परिवाराच्या मनावर खोलवर आघात करुन गेला.
शहरातील निराधार व निराश्रीतांना मायेची उबदार चादर वाटप तसेच मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळांचे वाटप हा स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथे शिकलेल्या बालमित्र परिवार कुंडलवाडी बॅच 1996 यांनी स्वंयप्रेरणेने व स्वंयस्फुर्तीने घेतला आणि आजही समाजात माणूसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.
शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्टँड परिसर, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा परिसर तसेच मुख्य रस्ते व पुलाखाली आश्रयास असणार्या जवळपास 50 पेक्षा जास्त अनाथ, अपंग, निराधार, निराश्रीत, बेवारस, भटके, मानसिक विकलांग इ. चा रात्री उशीरापर्यंत शोध घेवून त्यांना एक उबदार व गरम चादर, टोपी व रात्रीचे एक वेळचे जेवण बालमित्रांकडून देण्यात आले. तसेच रामप्रताप मालपाणी मतिमंद विद्यालयातील जवळपास शंभरपेक्षा जास्त मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळांचे कीट वाटप करण्यात आले. यामध्ये सफरचंद, पेरु, संत्री व केळी या फळांचा समावेश होता. बालमित्र परिवाराकडून यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले असून यामध्ये कुंडलवाडी शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय बॅग व लेखन साहित्य कीट वाटप, दिवाळी फराळ वाटप यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
हा उपक्रम ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून तसेच या परिवाराचे कृतीशिल सदस्य धर्मपुरी यन्नावार व उमाकांत शिवशेट्टे यांच्या परिश्रमातून तसेच भूषण देशपांडे, साजिद शेख, राजेश्वर कोलंबरे, स्मिता ठक्कुरवार, सचिन तुंगेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली व दिनेश कत्तुरवार, शोभा कासेवाड, बालाजी येमेकर, निळकंठ दरपूरे, फयाज शेख, विजय दिंडे, सायलू तोंदुलवार, रेखा कोत्तावार, लिंबादास तुमेदवार, गणेश रापेल्लीवार, शंकर कुरणापल्ले, नंदावनी कोटलावार, साईनाथ कोनेरवार, शंकर निलपवार, किरण हमंद, सायलू तुमेदवार, मारोती कदम, मारोती शिवशेट्टे, राजू सोमावार, सदानंद हमंद, अशोक शिळेकर, नागेश मदिकुंटावार, रेखा कासेवाड, पोशट्टी नागुलवार, हणमलू मुखेरवार, साहेबराव कोंडावार, दिनेश कवठाळे, रमेश गवते, गणेश उत्तरवार, वैजयंता कोंबरे, मारोती पोरडवार यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.