कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड.मो.नं.7709217188 नांदेड शहर गेल्या चार दिवसांपासून अंधारात बुडालेले आहे. वीजपुरवठा तब्बल ६-६ तास बंद राहत आहे, आणि याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानात, जेव्हा पंखे आणि वातानुकूल यंत्रणा बंद पडतात, तेव्हा घराघरांतून हाहाकार उमटतो. पण या सगळ्या गोंधळात आपले लोकप्रतिनिधी कुठे आहेत? त्यांचा आवाज का ऐकू येत नाही? का त्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही? हा प्रश्न जनतेतून छुप्या आणि दबक्या आवाजात ऐकू येत आहे. सोशल मीडियावर डरकाळ्या फोडणारे वाघ मात्र घराच्या समोर असलेल्या नाली वर बसून मोबाईल चार्जिंग कसा करावा हा विचार करताना दिसत आहेत.


लाईट बंद, जनता हैराण
नांदेडमधील वीजपुरवठ्याची समस्या नवीन नाही, पण गेल्या चार दिवसांपासून तर परिस्थिती असह्य झाली आहे. सकाळी ६ तास, रात्री ६ तास, असे वीजेचे लपंडाव सुरू आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, छोट्या व्यावसायिकांचे काम, आणि दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे. वृद्ध आणि लहान मुलांना उष्णतेमुळे होणारा त्रास तर वेगळाच. वीज कंपनीकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही, फक्त “तांत्रिक बिघाड” किंवा “दुरुस्तीचे काम” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. पण चार दिवस उलटूनही ही “दुरुस्ती” का पूर्ण होत नाही? हा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रशासनास विचारत आहे.

मुर्दाड लोकप्रतिनिधी
आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या संकटात कुठे गायब आहेत? त्यांनी वीज कंपनीवर दबाव टाकून तातडीने उपाययोजना का केल्या नाहीत? की त्यांना फक्त निवडणुकीच्या वेळीच जनतेची आठवण येते? नांदेडच्या जनतेने त्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवले, पण आता तीच जनता अंधारात आणि उकाड्यात तडफडत आहे. लोकप्रतिनिधींची ही निष्क्रियता म्हणजे जनतेच्या विश्वासाचा घोर विश्वासघात आहे. परंतु अंदभक्ता प्रमाणे मूग गिळून बसलेली युवापिढी रस्त्यावर उतरून जाब का विचारत नाही. हा संशोधनाचा विषय आहे.

बॉयलर कोंबड्यासारखी जनता
पण यात जनतेचीही जबाबदारी आहे. का आपण प्रत्येक वेळी चूप राहतो? का आपण रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद करत नाही? बॉयलर कोंबड्यासारखी ही निमूटपणे सहन करण्याची वृत्ती कधी बदलणार? जर जनतेने एकजुटीने आंदोलन केले, वीज कंपनी आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारला, तरच काही बदल होईल. नाहीतर हा अंधार आणि ही निराशा कायम राहील. तसे पाहिले तर नांदेड शहरात राहणारी जनता ही ७०% ग्रामीण भागातून आलेली आहे. कुणी लेकरांच्या शिक्षणासाठी, कुणी मिळेल ते काम करण्यासाठी तर कुणी नोकरीच्या निमित्ताने येऊन येथे स्थायिक झालेले रहिवाशी आहेत. गावाकडे मोठ्या बाता मारणारे शहरी महाभाग निपचित पणे अंधारात असलेल्या मेट्रो सिटीचा काळाकुट्ट अंधार सहन करीत आहेत.

काय आहे उपाय?
लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यावी त्यांनी वीज कंपनीवर दबाव टाकून तातडीने उपाययोजना कराव्यात. अंधारात आणि उकाड्यात असलेल्या जनतेला दिलासा द्यावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधिंची गोची करतील अशी शंका नाकारता येत नाही. वीज कंपनीने पारदर्शकता दाखवावी नेमके काय बिघाड आहे, किती वेळ लागणार, याची माहिती जनतेला द्यावी.तसेच तंत्रज्ञानाच्या युगात सामान्य जनतेची फसवणूक करू नये. जनतेने आवाज उठवावा- नांदेड शहरातील जनतेने शांत राहण्याऐवजी आंदोलन, निवेदने आणि सोशल मीडियाद्वारे दबाव निर्माण करावा.
पर्यायी व्यवस्था आणि नवीन डावपेच सौरऊर्जा,जनरेटर यासारख्या पर्यायांचा विचार केला तर स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे केले असून स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत.मुबलक प्रमाणात घरगुती सौरऊर्जा प्रकल्प गल्लीबोळात दिसत आहेत.मग लाईट खंडीत होणे किंवा वेळोवेळी बंद पडणे हे कशाचे धोतक आहे. बहुतेक लोडशेडींग पुन्हा कार्यान्वित करण्याचा डाव असावा किंवा आंबानी शेठजी कडे विद्युत वितरण कंपनी सोपविण्याचा प्रयत्न असावा ह्या शंका मनामध्ये येणे साहजिक आहे. हा धोका असल्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई विद्युत वितरण कंपनी विरोधात सुरु करीत आहोत.
नांदेडची जनता आता जागी होऊन आपल्या हक्कासाठी लढली पाहिजे. लोकप्रतिनिधींना जागे करा, नाहीतर पुढच्या निवडणुकीत त्यांना अंधारात ठेवा! हा अंधार फक्त विजेचा नाही, तर व्यवस्थेच्या नाकर्तेपणाचा आहे. आता प्रश्न आहे, आपण कधी जागे होणार? आम्ही जागे झालो आहोत. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आमचा निर्धार आहे. शक्य होत असेल तर ८ मे २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे यावे.
आम्ही त्यांना भिडणार आहोत ज्यांनी आम्हाला अंधारात ठेवले. इन्कलाब जिंदाबाद!
लेखक- कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड.मो.नं.7709217188 दिनांक- ५ मे २०२५