
नांदेड| ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने आज ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. यानिमित्त पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी या उत्सवात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल झाले आहेत. नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.


सालाना बरसी साठी भव्य दिव्य असा शामियाना उभारला आहे.. लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या अधिपत्याखाली हा सालाना बरसीचा उत्सव आयजित केला आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येत आहे.

बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, संत बाबा गुरूदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब,नानकसर संप्रदाचे मुखी संत बाबा घालासिंघ, संत बाबा जोगासिंघ कर्नालवाले, संत बाबा सतलानी अमृतसर,माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक सरदारडॉ विजय सतबिर सिंघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


लंगर साहिब चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या अधिपत्याखाली हा सालाना बरसीचा उत्सव दरवर्षी आयजित केला जातो. जवळपास ५० हजार भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. मुंबई, दिल्ली, पंजाब हरियाणा राज्यातील भाविक या सोहळ्यात आपले योगदान देतात. सेवेचा महान वारसा अविरत सुरू असून संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या आशीर्वादाने हा वसा सुरू आहे.




