मुंबई| नुकत्याच संपन्न झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांची ओळख पटवण्यात अखेर काँग्रेसला यश आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या त्यां आमदारावर आठवड्याभरात कारवाई होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्यावेळेस या आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी महायुतीचे 9, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. यामुळे महाविकास आघाडीतील शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. आता या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर पक्षाशी गद्दारी केल्याप्रकरणी कार्यवाहीची टांगती तलवार आहे, ते आमदार कोण याची ओळख पटली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांत मराठवाड्यातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 तथा मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी यासंबंधीचा अहवाल दिल्लीला पाठवला आहे. फुटीर आमदारांवर आता कारवाई केली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका सहन करावा लागेल, अशी भीती या नेत्यांनी आपल्या अहवालात केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांवर पुढील आठवड्याभरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
नांदेड, मुंबईच्या आमदारांची बंडखोरी
विजय वडेट्टीवार यांनी याविषयी बोलताना सांगितले की, नांदेड व मुंबईच्या काँग्रेस आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले. त्याचा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवला आहे. आमच्या आमदारांना बॅलेटवर एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये मतदान करायचे होते. ज्यांनी त्या फॉरमॅटचे उल्लंघन केले त्यांना आम्ही ट्रॅप केले. त्यांची ओळख पटवली. आता त्यांच्यावर एका आठवड्याच्या आत कारवाई अपेक्षित आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बंडखोरांची हिंमत वाढली, असे ते म्हणाले.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकाप उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांचा पराभव झाला. यामुळे हा पराभव महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.