नांदेड | येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या निमित्ताने मंडळाच्या उपकार्यालयात एक विशेष बैठक घेऊन या बैठकीत सदरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मोहनराव कुंटुरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शरदचंद्र हयातनगरकर, गजानन हिंगमिरे तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांची उपस्थिती होती.


शहरातील मालेगाव रोड स्थित पवननगर येथील मंडळाच्या उपकार्यालयात सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सप्तरंगी साहित्य मंडळाची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी होती. या संबंधाने सप्तरंगी साहित्य मंडळाने आयोजित केलेल्या सर्व साहित्य संमेलनात या बाबत ठराव घेण्यात आला होता. आता भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मंडळाने सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला. यावेळी गजानन हिंगमिरे, प्रज्ञाधर ढवळे, शरदचंद्र हयातनगरकर, शंकर गच्चे, नागोराव डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रणजित गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग कोकुलवार यांनी केले तर आभार शंकर गच्चे यांनी मानले. सप्तरंगी साहित्य मंडळाने पारित केलेल्या अभिनंदनाच्या ठरावास साहित्यिक विचारवंतांनी पाठींबा दिला.


‘बोलीभाषा संवर्धनासाठी प्रयत्न हवेत’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधी केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे. तो स्वागतार्ह आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. या निधीचा उपयोग योग्य तऱ्हेने व्हायला हवा. बोलीभाषा संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मराठी भाषेतील साहित्य आणि साहित्यिक यांची प्रतिष्ठा अबाधित राहावी याकडे लक्ष द्यायला हवे. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरील अभ्यासक्रमात मराठी भाषेची अनिवार्यता अधोरेखित व्हायला हवी. त्यासोबतच दैनंदिन जीवनातील व्यवहारात मराठी भाषेचं उपयोजन अधिक ठसठशीतपणे व्हायला हवं. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील अनेक साहित्य संस्था प्रयत्नशील असतात. अशा संस्थांना आर्थिक बळकटी देणे हे शासनाचे कर्तव्य ठरते. यादृष्टीने शासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी आमची सूचना आहे. नांदेड येथील सप्तरंगी साहित्य मंडळ वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करते आहे. त्यांनी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेतला, त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. – डॉ. जगदीश कदम, साहित्यिक नांदेड

‘अनेक साहित्य संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान’ ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
हा दर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक व्यक्तींबरोबर अनेक साहित्य संस्थांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यापैकी एक सप्तरंगी साहित्य मंडळ आहे. महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यात सप्तरंगी साहित्य मंडळाचे साहित्यिक कार्य अधोरेखित करावे असे आहे. विविध साहित्य संमेलने, चर्चासत्रे, परिसंवाद आणि कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदितांना मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य सप्तरंगी साहित्य मंडळांनी केले आहे, करत आहेत. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अशी अनेक मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर, सप्तरंगी मंडळाने लगेच बैठक घेऊन, अभिनंदनचा ठराव केला. या बांधिलकीसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे अभिनंदन. देवीदास फुलारी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर.

‘सहा दशकांपासून सुरू असलेल्या लढाईला यश’ ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग
असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा. यासाठी मराठी दिग्गज लेखकांची मागणी होती. दोन हजार वर्षांपूर्वीचा समृद्ध इतिहास असलेल्या मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा दशकांपासून सुरू असलेल्या लढाईला यश आले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनांचीच नाही तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसाचीही स्वप्नपूर्ती झाली आहे. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत! – प्रा. महेश मोरे, नांदेड.