किनवट/नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी शनिवार दिनांक १३ जुलै रोजी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तीनगर या आदिवासी गावात पोहोचल्या. गावाच्या मुख्य ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतर पायी प्रवास करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (पीएम- जनमन) अंतर्गत आदीम व कोलाम समाजातील लाभार्थ्यांना शासकीय विविध योजनेचे लाभ यासंदर्भात कामांची पाहणी केली. तसेच गावातील महिला भगिनींना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देवून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज देखील भरून घेतले. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी प्रत्येक गावांमध्ये कॅम्प घेवून अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल हे दररोज आढावा घेत असून ठिकठिकाणी भेटी देत आहेत. आज मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी किनवट तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या शिवशक्तीनगर गावास भेट देवून संवाद साधला.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) अंतर्गत गाव स्तरावरील घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आदिवासी महिलांनी सादर केलेल्या हुसाडी नृत्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सहभागही नोंदवला, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे स्वागत मोठ्या आदराने केले आणि त्यांच्या आगमनाने गावात एक नवीन ऊर्जा संचारली होती. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांनी बांबू पासून बनवलेल्या विविध वस्तूंची पाहणी करून कौतुक केले.
यावेळी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य गोवर्धन मुंडे, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, समाजसेवक दत्ता आडे, तालुका आरोग्य अधिकारी के.पी. गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ठकरोड, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता टारपे, बांधकाम विभागाचे उप अभियंता कावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, विस्तार अधिकारी व्ही.एम. मुकनर, पी.एस. वाघमारे, मुकेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती गावागावात देण्यासाठी दररोज वेगवेगळ्या गावात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ह्या भेटी देत आहेत. आज त्यांनी किनवट तालुक्यातील जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शिवशक्तीनगर या वनक्षेत्रात स्थित असलेल्या गावास भेट दिली. या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी वन क्षेत्रातून तीन किलोमीटर अंतर पायी चालून गावात पोहोचल्या आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने संदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (पीएम- जनयन) अंतर्गत आदिम व कोलाम घरकुल कामांची पहाणी केली.