देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरात गेल्या पाच-सहा महिन्यापासून गोवंशाला गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला देगलूर पोलिसांनी अटक केली असून त्यांना देगलूरच्या न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी होती.याच टोळक्याने तालुक्यातील कुशावाडी येथील संग्राम माळगोंडे यांचे बैल चोरून नेले. या प्रकरणी देगलूरच्या न्यायालयाने दि.२ जून रोजी त्यांना पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


नांदेड शहराच्या लेबर कॉलनीतील सय्यद अमीर अली सय्यद अन्वर अली, सय्यद उमर सय्यद फारुख, अब्दुल कलाम अब्दुल सलाम, सय्यद शोएब सय्यद फारुख, महबूब पाशा शेख, समीर अनिस खपरेशी या सहा गोवंश चोरट्यांनी मागील काळात देगलूर तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे चोरटे इनोव्हा कार (क्र. एम एच०२ ए पी ७००८) या नकली नंबर प्लेट लावलेल्या गाडीच्या पाठीमागील सीट काढून टाकून तसेच समोरच्या बाजूस ‘पोलीस’ किंवा ‘प्रेस’ अशी पाटी लावून जनावरांना गुणीचे इंजेक्शन देऊन त्यांचे पाय बांधून या गाडीमध्ये टाकून चोरून नेत असत.

दि.२१ मार्च रोजी शहराच्या बापू नगरातील प्रकाश हणमंतराव बोगुलवार यांची सुमारे ९५ हजार रुपयाची मोठी गाय या चोरट्यांनी गुंगीचे औषध देऊन पळवून नेली. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच चोरट्यांनी मागील कांही दिवसात माजी नगरसेवक अशोक गंदपवार यांची तीन वर्षांची कालवड देखील चोरून नेली होती.शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी गोवंश चोरीचे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन देगलूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रूदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानोबा केंद्रे, पोलीस नायक कृष्णा तलवारे,पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर मलदोडे, पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव सगरोळीकर, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ मोटरगे, पोलीस कॉन्स्टेबल राजवीरसिंग बुंगई, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत मुदिराज व पोलीस कॉन्स्टेबल मधुकर नामपल्ले यांच्या टीमने सखोल तपास केला असता त्यांना इनोव्हा गाडीतून गोवंश चोरणारी सहा जणांची टोळी सापडली होती.

देगलूर पोलिसांनी या टोळक्याला ताब्यात घेऊन देगलूरच्या न्यायालयापुढे उभे केले असता मा. न्यायालयाने या सहा जणांना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.तत्पूर्वी दि. १३ मे च्या रात्री ११ ते १४ मे च्या पहाटे पाचच्या दरम्यान या चोरट्यांनी तालुक्यातील कुुशावाडी येथील संग्राम विठ्ठल माळगोंडे यांची घरासमोर रस्त्यावर बांधलेली दिड लाख रुपये किंमतीची बैलगाडी चोरून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड आणि कर्मचाऱ्यांनी या गोवंश चोरट्यांना दि.२ जून रोजी देगलूरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
