नांदेडराजकीय

Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

नांदेड| राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपर हिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला.

Nanded dio News 13 Oct 2024 6 Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - NNL

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्यवतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रशासनाच्यावतीने स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील दहा लाख भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन सुरु केलेली ही योजना आहे. आता महिनाभरात भाऊबीज पण येईल. आमची भगिनींसाठी ही ओवाळणी थांबणार नाही. ती सतत सुरूच राहीन. योजना सुरु होऊन तीन महिने झालेत, जवळपास 2 कोटी 30 लाख भगिनींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने 33 हजार कोटींची तरतूद केली आहे. तर 17 हजार कोटी रूपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर 2024 या दोन महिन्यांचे आगाऊ हप्तेही खात्यात जमा केले आहेत. सध्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रूपये जमा होताहेत.

Nanded dio News 13 Oct 2024 7 Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - NNL

तर यापुढे यामध्ये योजनेच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे प्रत्येक महिलेला अधिक आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. छोटा, मोठा व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा पाठिंबा महिलांना मिळणार आहे. काही महिला या दिशेने पुढेही जात आहेत, त्याचे समाधान आहे. या महिला लखपती दिदी झाल्याचे पाहायचे आहे, असा आशावादही मुख्यमंत्री यांनी व्यक्त करत महिलांना प्रेरित केले. आर्थिक सक्षम महिला या ध्येयाबरोबरच सुरक्षित महिला यालाही शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात 50 टक्के सवलतीचा लाभही देण्यात येत आहे. या योजनांबरोबरच सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनाही सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गान सम्राज्ञी आशाताई भोसले यांनीही या योजनेचे कौतुक करत सरकारचे अभिनंदन केले आहे, हे विशेष. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत ‘शासन आपल्या दारी’सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पाच कोटी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून अतिशय समाधान होत आहे. बहिणींच्या डोळ्यातील आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळते.

तत्पूर्वी आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळातवेळ काढून दोनवेळा पुढे ढकलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली याबद्दल आभार व्यक्त केले. त्यासोबतच मोठ्याप्रमाणात विकासासाठी निधी दिल्याबद्दलही आभार व्यक्त केले. राजर्षी पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. महिलांच्या आयुष्यात या नव्या आर्थिक क्रांतीने भर घातल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय येथे 200 हून 500 खाटांची संख्या वाढवून श्रेणी वाढ केल्याबद्दल तसेच नरहर कुरूंदकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र अव्वल
लाडक्या बहिणीला रक्कम दिली, मग लाडक्या भावांचे काय ? असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर भावांसाठीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार प्रशिक्षण भत्ता देऊन प्रशिक्षण योजना आपण राबवली, अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी काढले.

Nanded dio News 13 Oct 2024 1 Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियानासह इतर योजनांच्या महिला, युवा, ज्येष्ठ लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. सूत्रसंचालन स्म‍िता मोहरीर यांनी केले. आभार शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

गोमातांचे पूजन, ‘खेळ पैठणी’ची रंगत
राज्यमाता म्हणून नुकताच गायीला सन्मान राज्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी या प्रजातीच्या गोमातांचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील कला, गितांनी कार्यक्रमाने रंगत आणली. तसेच उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा’ हा प्रश्न मंजुषा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला बरोबर उत्तर देणाऱ्या प्रत्येक विजेत्या महिलेस मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!