
नांदेड, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा तसेच ग्रामीण भागात विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात सिने कलाकारांनी विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची पाहणी केली.


याअंतर्गत अभिनेते संदीप पाठक (Sandeep Pathak) व अभिनेत्री रसिकारसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) यांनी १३ मार्च रोजी नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत नेरली तर्फे बोंढार, देगलूर तालुक्यातील येरगी तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला.

भेटीदरम्यान त्यांनी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, वृक्षारोपण, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता उपक्रम, घरकुल योजना तसेच ग्रामपंचायतींचे विविध अभिनव उपक्रम यांची माहिती घेतली.


ग्रामपंचायत नेरली तर्फे बोंढार येथे नूतन वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रामपंचायत येरगी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन करून जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात आली. यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्रामस्थांनाही मार्गदर्शन केले.


तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे शुद्ध पाणीपुरवठा योजना, लोकसहभागातून उभारलेले मंगल कार्यालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, मुलांसाठी खेळाचे मैदान, डिजिटल अंगणवाडी व शाळा तसेच शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेची पाहणी करून कलाकारांनी समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.



