नांदेड| प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल 80 हजार घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्याने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.


या भव्य उपक्रमाच्या शुभारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.


प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी 1 लाख 49 हजार 731 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 1 लाख 39 हजार 517 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आली आहे. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप तर 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित कंला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 21 हजार 91 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा 15 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, एकूण 181 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांचे खाते पडताळणी सुरू असून लवकरच त्यांनाही निधी वितरित करण्यात येणार आहे.



विहित मुदतीत घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार
मंजूर घरकुलांचे विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्यासाठी व लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आज भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवस उपक्रमांतर्गत ही घरकुले पूर्ण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजुरी देण्यात आली आहे.



