नांदेड| नांदेड येथे होणाऱ्या भटके विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजाच्या एल्गार महामोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. अविनाश भोसीकर यांनी केले आहे. ओबीसींच्या हक्क, आरक्षण आणि सन्मानासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचे ते म्हणाले.


ओबीसी समाजाच्या आरक्षणावर जाणीवपूर्वक गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ॲड. भोसीकर म्हणाले की, “भटके, विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजावर सतत अन्याय होत आहे. आरक्षणाचे हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला ओबीसी विरोधी शासन निर्णय (जीआर) हा समाजघातक असून, तो तात्काळ रद्द करण्यात यावा.” त्यांनी सांगितले की, “समाजातील सर्व घटकांनी आता जागे व्हावे. आपला हक्क, आपली ओळख आणि आपला सन्मान वाचवण्यासाठी ओबीसी समाजाने एकदिलाने रस्त्यावर उतरले पाहिजे. हा मोर्चा ही केवळ निदर्शने नसून, आपल्या अस्तित्वासाठीची घोषणा आहे.” असेही ते म्हणाले.


हा एल्गार महामोर्चा दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथे होणार आहे. मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता नवा मोंढा मैदानातून होईल. तेथून मोर्चा अण्णाभाऊ साठे चौक या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचेल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर प्रचंड जनसभेत होणार आहे. या सभेला ओबीसी आरक्षणाचे पुरस्कर्ते ॲड. प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


एल्गार महामोर्चातून खालील प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत. 1.) २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेला ओबीसी विरोधी शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करा. 2.) जातनिहाय जनगणना त्वरित करा, जेणेकरून प्रत्येक समाजगटाचे खरे सामाजिक-आर्थिक वास्तव स्पष्ट होईल. 3) ५८ लाख बेकायदा कुणबी नोंदी तात्काळ रद्द करा, ज्यामुळे ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण बेकायदेशीरपणे कमी होत आहे.

4.) प्रत्येक तालुका व जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करा, जेणेकरून शिक्षणात समान संधी निर्माण होईल. ॲड. अविनाश भोसीकर यांनी समाजातील सर्व संघटना, नेते, कार्यकर्ते आणि तरुणांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नाही, हा लढा आहे आपल्या संपूर्ण समाजाचा. आज आपण एकत्र आलो नाही, तर भविष्यात आपला इतिहासही आपल्याला माफ करणार नाही.” त्यांनी महिलांनाही आवाहन करत सांगितले की, “महिलांचा सहभाग हा समाजबांधणीचा कणा आहे. ओबीसी महिलांनी या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. विविध जिल्ह्यांमधून कार्यकर्त्यांच्या गाड्या, मोटरसायकल रॅली, बॅनर, झेंडे, घोषवाक्ये या माध्यमातून जनतेला मोर्चासाठी प्रेरित केले जात आहे. अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.
नांदेड येथील २९ ऑक्टोबरचा ओबीसी एल्गार महामोर्चा हा केवळ आंदोलन नाही, तर तो समाजाच्या आत्मसन्मानाची आणि न्यायासाठीच्या संघर्षाची घोषणा आहे. शासनाने लोकांच्या भावनांचा आदर करून योग्य निर्णय घेतले नाहीत, तर या आंदोलनाची लाट राज्यभर पसरू शकते, असा इशारा ॲड.अविनाश भोसीकर, नामदेव आइलवाड, डॉ. बी. डी . चव्हाण, सटवाजी माचनवार इत्यादी ओबीसी नेत्यांनी दिला आहे.

