नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी शोभा यात्रेस प्रारंभ झाला. या शोभा यात्रेत विविध महाविद्यालयातून सहभागी स्पर्धक कलावंतानी सहभाग घेतला. या शोभा यात्रेत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. शोभायात्रेमध्ये मराठवाड्याची लोककला, लोकसंस्कृती, दिंडी, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक या बरोबरच मतदान जनजागृती करीत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ असा संदेश शोभा यात्रेतून दिला.
शोभा यात्रेची सुरुवात विष्णूपुरी गावातील मारुती मंदिरापासून करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, ईंजि. नारायण चौधरी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, प्राचार्य सुनील हंबर्डे, आदींची उपस्थिती होती.
शोभायात्रेत वै. धुंडा महाराज देगलूर महाविद्यालयाच्या संघांनी ‘पंढरीची दिंडी’ देखावा सादर करत टाळ मृदुंगाच्या जय घोषात अभंग सादर केले. तर इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी विष्णुपुरी च्य संघाने ‘माळेगाव यात्रेच्या देखाव्यातून माळेगाव दक्षिण भारतातील यात्रेची ओळख शोभा यात्रेतून करून दिली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात पारंपारिक वेशभूषा धारण करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात विष्णुपुरी चा परिसर दुमदुमून गेला. जळकोट येथील संभाजी केंद्रे महाविद्यालय संघाने मराठवाड्याची कला आणि संस्कृती देखावा शोभायात्रेतून सादर केला. तर वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाने ‘मतदान जनजागृती’ करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत लोकशाहीला मजबूत करण्याचे आवाहन केले. शोभा यात्रेचे परीक्षण डॉ. विजया साखरे, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. एम. आर. जाधव, डॉ. राजपाल चिखलीकर, डॉ. शिल्पा शेंडगे यांनी केले.