नांदेड| मागास वर्गीयांना सामाजिक आर्थिक विकासासाठी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड उपकर 20 टक्के सेस मागासवर्गीय कल्याण निधी 2024-25 अंतर्गत नऊ योजनांबाबतचे अर्ज 10 ऑगस्टपर्यत मागविण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने परिपूर्ण अर्जाचा प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात 10 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केला आहे.


या योजनांमध्ये मागासवर्गीय झेरॉक्स, (प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशिन) वाटप करणे, मागासवर्गीय प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थी/विद्यार्थीनींना सायकल पुरविणे, मागासवर्गीय मिरची कांडप पुरविणे योजना, मागास- वर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे योजना, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, मागासवर्गीय व्यक्तींना दुग्ध व्यवसायासाठी गाई व म्हैस पुरविणे, निराधार, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत एकल मागासवर्गीय महिलांना उपजिविकेसाठी सहाय्य करणे या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात गट विकास अधिकाऱ्यांकडे अटी व शर्तीच्या अधिन राहून परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.




