
नांदेड| प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, अवघ्या काही दिवसांतच मोठी कारवाई करत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.

नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान एकूण ५ गुन्हे नोंदवून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर संबंधित पदार्थांचा समावेश आहे.



विशेष म्हणजे, नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारेही काही कारवाया यशस्वी झाल्या आहेत. पोलिसांनी ‘खबऱ्या व्हा’ असे आवाहन करत ९१ ५० १०० १०० या हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. गुटखा माफियांवर पोलिसांचा कडक प्रहार सुरूच असून, या मोहिमेमुळे अवैध व्यवसायांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




