नांदेड| भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे भाग्यनगर ते आनंदनगर रोडवर अत्याधुनिक सुविधांनी उभारण्यात आलेल्या अंत्योदय जनसंपर्क कार्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्य अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण , माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण , राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे , माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , पालकमंत्री अतुल सावे , आ. तुषार राठोड, आ. श्रीजया चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


चार मजली अंत्योदय कार्यालयात जनकल्याणासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तळ मजल्यावर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे कक्ष , शिवाय याच ठिकाणी त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे . मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठीचे अर्ज स्वीकारणे आणि त्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करणे यासाठी येथे सेवा दिली जाणार आहे. या विभागाला जनसेवा विभाग असे नाव देण्यात आले आहे.


पहिल्या माळ्यावर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यक्रमांसाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे . पक्षाच्या बैठका , परिसंवाद कक्ष पक्षाचे पत्रकार परिषदा याठिकाणी होणार आहेत. याच माळ्यावर अद्यावत असे ग्रंथालय उभारण्यात आले असून भोजन कक्षाची स्थापना ही करण्यात आली आहे . दुसऱ्या माळ्यावर सोशल मीडिया कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाचे काम चालणार आहे . शिवाय इलेक्ट्रॉनिक ,प्रिंट मीडियासाठी ही या ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. येथे कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात आला असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पत्रकार परिषदा होतील शिवाय पत्रकारांनाही बसण्याची आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.



चौथ्या माळ्यावर वॉर रूम तयार करण्यात आली असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या निवडणुका या संबंधित कामकाज चालणार असून आपत्कालीन कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे . कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना 24 तास सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि केंद्रीय पदाधिकारी आणि प्रवासी कार्यकर्ते , संघटन मंत्र्यांसाठी निवास व्यवस्थेची सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभा सदस्याचे पहिले आणि इतके अत्याधुनिक कार्यालय नांदेड मध्ये साकारले आहे . जनसेवेसाठी अंत्योदय जनसंपर्क कार्यालय आजपासून कार्यरत होणार आहे. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले अंत्योदय जनसंपर्क कार्यालय निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि जनतेच्या सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे.

अंतोदय जनसंपर्क कार्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजनही अमितभाई शाह यांनी यावेळी केले. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या वेबसाईटचे उद्घाटनही अमित भाई शाह यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन हावगीराव गोपछडे यांनी केले. अत्याधुनिक ‘अंत्योदय’ संपर्क कार्यालयाच्या अभिनव संकल्पनेचे अमित भाई शाह यांनी कौतुक केले.
राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि समुपदेशनासह अत्याधुनिक सोयी सुविधांनी उभारण्यात आलेल्या भाजपा ‘अंत्योदय’ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खा. डॉ. अजित गोपछडे यांचे कौतुक केले . अत्याधुनिक सोयी सुविधांसह सुरू केलेली अंत्योदय हे जनसंपर्क कार्यालय निश्चितपणे समाजातील शेवटच्या घटकाच्या जनसेवेला वाहून घेईल अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या.


