नांदेड| जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीस अटक करून स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एकूण ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले असून, सुमारे २,२४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदर आरोपी शेख सोहेल ऊर्फ गांजा (रा. चिखली, ता. किनवट) हा नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर तसेच तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील एकूण १९ गुन्ह्यांत फरार होता. मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्वतंत्र पथके तयार केली. दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी इसापूर जंगल परिसरात चोरीच्या मोटारसायकली ठेवून त्यांची विक्री करत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.


तपासादरम्यान आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपीने या मोटारसायकली नांदेड, माहूर, किनवट, महागाव (यवतमाळ), कोरपना (चंद्रपूर) तसेच अदिलाबाद (तेलंगणा) येथून चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित मोटारसायकल चोरीचे गुन्हे इसापूर, किनवट, माहूर, महागाव, कोरपना आदी पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन इसापूर यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (भीकर), सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.

