किनवट, परमेश्वर पेशवे| विद्यार्थी असू देत की पालक स्वतःसह कुठलीही वयोमर्यादा न ठेवता क्रीडा शिक्षकांनी आपल्यातील खेळाडू जागवून प्रत्येकातील आवडीचा कुठलाही मैदानी खेळ जपावा, ज्यामुळे तुमचा खेळ होईल, व्यायाम होईल, ताण-तणावाचे व्यवस्थापन होईल एकंदरीत सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल, असे प्रतिपादन तहसीलदार तथा तालुका क्रीडा समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले.


येथील तालुका क्रीडा संकुलात तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक व खेळाडूंचा ऑनलाईन फॉर्म भरणे बाबत प्रशिक्षणाचा अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, नव्यानेच रुजू झालेल्या याच तालुक्याच्या भूमिकन्या तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुख, जिल्हा कोच आकाश भवरे , केंद्रप्रमुख ग. नु. जाधव मंचावर उपस्थित होते.


पुढे बोलतांना डॉ. चौंडेकर म्हणाल्या की, खेळाने आरोग्य चांगलं राहतं, मेहनत करण्याची वृत्ती वाढते , शिस्त रुजते. आज मोबाईल स्क्रीनचं मुलांसह मोठ्यांनाही वेड लागलं आहे. यापासून आधी पालकांनी दूर व्हावं व मुलांनाही दूर ठेवावं. आजकालच्या भयावह स्थितीत मुला मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत व विद्यटनवादी शक्तीशी सामोरं जाण्याचं त्यांच्यात धाडस निर्माण करावं, असेही त्या म्हणाल्या.


उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका क्रीडा संयोजक राष्ट्रीय कोच संदीप यशीमोड यांनी आभार मानले. तदनंतर जिल्हा कोच आकाश भवरे यांनी खेळाडूंचे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याविषयी प्रशिक्षण दिले. भारताकडून निवड होऊन दक्षिण कोरिया येथून धनुर्विदेचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या ज्ञानेशला खेळासाठी प्रोत्साहन देणारे त्याचे वडील बालाजी चेरले यांचा व आपल्या मुलासह इतर दोघांना सैनिक स्कूल मध्ये पात्र करण्यासाठी कठोर अभ्यास घेणारे राहूल तामगाडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुक्यातील सर्व शाळेतील क्रीडा प्रेमी शिक्षक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी , तालुका क्रीडा संयोजक , तालुका क्रीडा संकुलचे कर्मचारी राजू मेलडे , मारुती यशिमोड व आतिश तामगाडगे यांनी बैठक व प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


