नांदेड| वैद्यकीय सेवा हा केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकीचे माध्यम म्हणून गेल्या चार दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक व वैद्यकीय विशेषज्ञ डॉ. हंसराज दादारावजी वैद्य यांच्या बहुआयामी सेवाकार्याचा ‘जीवनगौरव अर्थात लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.



केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण कार्यालय, नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात डॉ. वैद्य यांना शाल, श्रीफळ व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण तथा सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांचे भाजप अध्यक्ष, संजय कोडगे, चैतन्यबापू देशमुख, सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



१९७९ पासून अखंड वैद्यकीय सेवा – ‘जेथे कमी, तेथे आम्ही’ या सेवाभावी ब्रीदवाक्याचा उल्लेख करत डॉ. वैद्य यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. वैद्य यांनी १९७९ पासून वजिराबाद, नांदेड येथे वैद्यकीय सेवा देत हजारो रुग्णांना आधार दिला आहे. त्यापूर्वी शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून औरंगाबाद व नांदेड येथे तब्बल ११ वर्षे त्यांनी सेवा बजावली.

वैद्यकीय सेवेसोबतच महिला, बालके, दिव्यांग, अंध, वृद्ध, बेघर, पूरग्रस्त आणि विविध आपत्तीग्रस्त विस्थापित घटकांसाठी त्यांनी सातत्याने मदतकार्य केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला व बाल सहाय्य कक्षाच्या समितीवर तीन दशकांहून अधिक काळ सदस्य म्हणून कार्यरत राहून त्यांनी अनेक महिलांना आधार दिला.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा – ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी डॉ. वैद्य यांनी गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. ग्रामीण भागातील गरीब, गरजू, दुर्लक्षित, आदिवासी, वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा, परित्यक्ता तसेच दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. सध्या ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काम, नांदेडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नेरली येथील कुष्ठधाम संस्थेच्या माध्यमातून कुष्ठरोगी व मतिमंद व्यक्तींसाठी वैद्यकीय उपचार, पुनर्वसन आणि सेवाकार्यातही त्यांचा सहभाग राहिला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनासह विविध क्षेत्रांत योगदान – अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी योगदान दिले आहे. वृक्षलागवड, शेतकरी मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, सामाजिक जनजागृती आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांतही त्यांनी कार्य केले आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत फेस्काम उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक सेवा पुरस्कार, पोलीस दलाचा ‘पोलीस मित्र’ सन्मान, दिव्यांग मित्र पुरस्कार तसेच कोरोना काळातील सेवेसाठी राज्यस्तरीय गौरव अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातही कविता व लेखनाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले आहे.
डॉ. हंसराज वैद्य यांचा जीवनप्रवास हा वैद्यकीय सेवेतून समाजसेवेकडे आणि समाजसेवेतून मानवतेच्या व्यापक व्रताकडे झालेली अखंड वाटचाल असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सप्तरंग सेवाभावी संस्थेने त्यांच्या कार्याचा जीवनगौरव करून सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाच्या योगदानाचा समाजासमोर सन्मान केला.

