हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी १८० नवीन घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून स्वतःच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या स्वप्नातील घराचा मार्ग मोकळा झाला आहे.



हिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९७ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ४७ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून, उर्वरित ५० लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलाचे बांधकाम सुरू केल्यानंतर नियमानुसार त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.



दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील १८० गरीब व गरजू कुटुंबे घरकुलाच्या प्रतीक्षेत होती. योजनेच्या यादीत नाव असूनही मंजुरीअभावी अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम रखडले होते. नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेख रफीक शेख महेबूब यांनी सर्वप्रथम घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर १८० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती घरकुल अभियंता सय्यद शारेख अली यांनी दिली. उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



गरीब कुटुंबांच्या स्वप्नांना मिळणार आधार – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या मंजुरीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःच्या मालकीचे पक्के घर उभारण्याची संधी मिळणार आहे. अनेक कुटुंबे आजही कच्च्या किंवा अपुऱ्या निवाऱ्यात राहत असून, पावसाळा, ऊन-वारा अशा परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा कुटुंबांसाठी घरकुल योजना केवळ सरकारी अनुदान नसून सुरक्षित निवाऱ्याचे स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वाची योजना आहे.

लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण – १८० नवीन घरकुलांना मंजुरी मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरकुल योजनेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांनी नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब यांचे आभार मानले आहेत. मंजूर घरकुलांचा निधी वेळेत उपलब्ध होऊन बांधकामे लवकर पूर्ण व्हावीत, तसेच उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकर मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लाभार्थ्यांसाठी जनहिताचे आवाहन – नुकतीच १८० प्रधानमंत्री आवास घरकुलांना मंजुरी मिळाल्याने संबंधित सर्व लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी नगरपंचायत कार्यालयातील घरकुल विभागाशी संपर्क साधून आवश्यक बांधकाम परवानगी व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, मुख्याधिकारी समाधान मसाळ तसेच सर्व नगरसेवकांनी केले आहे. घरकुल मंजुरीचा लाभ केवळ कागदावर न राहता प्रत्येक पात्र कुटुंबाचे घर प्रत्यक्षात उभे राहावे, यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क ठेवून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही नगरपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

