नांदेड| नांदेड जिल्ह्यात काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शासनाच्या प्रसिद्धीविषयक कामाच्या निमित्ताने मिळालेला अनुभव, सहकाऱ्यांसोबत केलेले प्रयत्न आणि या काळात निर्माण झालेले स्नेहबंध कायम स्मरणात राहतील, अशा भावना उपसंपादक अलका राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेल्या अलका पाटील यांची जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथे बदली झाली आहे. हिंगोली येथील नवीन पदावर रुजू होण्यासाठी त्यांना सोमवारी नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपिक-टंकलेखक अनिल चव्हाण, अहेमद ईस्माईल बेग, वाहनचालक रामकिशन तोकले आणि शिपाई चंद्रकांत गोधने यांनी अलका पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



शासनाच्या योजनांच्या प्रसिद्धीमध्ये योगदान – नांदेड येथील सेवाकाळात अलका पाटील यांनी राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या प्रसिद्धीविषयक कामात योगदान दिले. प्रसारमाध्यमांशी समन्वय साधून शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. नांदेड येथील सेवाकाळात मिळालेला अनुभव आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन पुढील वाटचालीत उपयुक्त ठरेल. सहकाऱ्यांनी दिलेला स्नेह आणि कामातून मिळालेली शिकवण हीच पुढील सेवेसाठीची शिदोरी असल्याचेही त्यांनी सांगितले.
२००९ पासून माहिती व प्रसिद्धी विभागात सेवा – अलका पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २००९ मध्ये मुंबई मुख्यालयात नियुक्ती झाली. त्यानंतर सन २०११ मध्ये त्यांची नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात लिपिक-नि-टंकलेखक पदावर बदली झाली. सन २०२० मध्ये विभागीय मर्यादित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची माहिती सहायक पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर उपसंपादक म्हणून त्यांनी नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात सेवा बजावली. आता हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयात त्या नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत.