हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिरंजनी गावात स्वच्छता चळवळीला अधिक बळ देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील महिलांना स्वच्छतेचा वाण म्हणून कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या दिशेने एक ठोस व सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मेघा पवन करेवाड होत्या. पंचायत समिती हिमायतनगरचे विस्तार अधिकारी श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक श्री. विजय जंगीलवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती क्षीरसागर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात समूह आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप प्रभनकर यांनी महिलांना स्वच्छता, आरोग्य व आजार प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, तसेच स्वच्छतेचा कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते श्री. पवन करेवाड यांनी केले. त्यांनी सांगितले की, स्वच्छता व आरोग्य शिक्षणात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.



ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापूर्वीही विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यात आले असून, श्रमदानातून राबविलेला ग्रामस्वच्छता उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. तसेच मागील पाच वर्षांत गावात सुमारे २.५ किलोमीटर बंदिस्त नाल्यांचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी यू. जे. पठाण मॅडम यांनी केले. या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून, गाव स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी सामूहिक सहभागातून प्रभावी पाऊल उचलले गेले असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. याच प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सिरंजनी येथील नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक व सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

