किनवट | घर विक्रीच्या पैशांचा तगादा व अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची दारू पाजून नदीत ढकलून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सव्वादोन महिन्यांनंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी किनवट पोलिसांनी प्रेयसी प्रियंका भगत व तिचा प्रियकर शेख रफीक शेख रशीद यांना अटक केली असून, त्यांच्यावर खून, अट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार किनवट येथील विनोद किसन भगत (वय ५२) यांचे २००३ मध्ये प्रियंका भगत हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. गोकंदा उपजिल्हा रुग्णालया जवळील अशोकनगर येथे त्यांच्या मालकीचे घर प्रियंकाने रफीकच्या मदतीने ३० लाखांना विकले. या व्यवहारानंतर रफीक व प्रियंका यांच्यातील ओळख अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचली.


घर विक्रीतील पैशाची मागणी विनोद भगत यांनी केली असता, यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. दरम्यान, दोघांनी कट रचून २९ ऑगस्ट रोजी विनोद भगत यांना दारू पाजली. दारूच्या नशेत असताना रफीक याने त्यांना मोटरसायकलवर बसवून खरबी परिसरात नेऊन पैनगंगा नदीच्या प्रवाहात ढकलून दिले.


विनोद भगत यांचा मृतदेह २ सप्टेंबर रोजी महागाव हद्दीत सापडला होता. त्यावेळी मृतदेह जाळण्यात आला होता. सिडीआर तपासातून संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. आयाजोद्दीन फयाजोद्दीन या साक्षीदाराच्या जबाबावरून आणि मृतदेहावरील कपडे, अंगठी व ओळख चिन्हांवरून हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

मयताची बहीण नंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून प्रियंका भगत व शेख रफीक यांना अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास पथकात पीएसआय झाडे, हेडकॉन्स्टेबल डकरे, प्रदीप कुमार आत्राम, सिद्धार्थ वाघमारे यांचा समावेश आहे.


