नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या वतीने आयोजित “तेरे सूर और मेरे गीत” या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. गायिका मेघा संजीवन यांच्यासह मुंबईहून खास आलेले स्टार गिटारिस्ट रॉनी सातमकर आणि चँग सिंगर हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेच. पण याचबरोबर दैनिक ‘गोदातीर समाचार’चे संपादक केशव घोणसे पाटील आणि इतर स्थानिक गायकांनीही या कार्यक्रमावर आपली छाप पाडली.


या कार्यक्रमास शिवसेनेचे ना. हेमंत पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्रीताई हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक संजीवन गायकवाड, संपादक तथा या कार्यक्रमातील गायक केशव घोणसे पाटील, गायिका मेघा संजीवन यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.



येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठा पाऊस असतानाही प्रचंड गर्दी केली होती. विविध चित्रपटातील नव्या जुन्या गीतांचा मनमुराद आनंद यावेळी प्रेक्षकांनी लुटला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. क्रांती चित्रपटातील ‘जिंदगी की, न तुटे लडी’ हे गीत शेवटी सर्व गायकांनी एकत्रितपणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.


कार्यक्रमाचे संगीत संयोजन शेख नईम, महेंद्र कदम, रतन चित्ते, शुद्धोधन कदम, स्वप्नील धुळे, किशोर आवटे, हंसराज चित्ते यांनी केले. ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था संतोष गट्टानी, सूर्यकांत यांनी पार पाडली, त्यांना प्रकाश कासेगावकर यांनी साथ दिली. विविध गायक- गायिकांच्या आवाजातील नव्या आणि जुन्या चित्रपटांतील गीते, त्याचबरोबर त्याच दर्जाचे वैविध्यपूर्ण संगीत असा एक अनोखा दर्जेदार कार्यक्रम नांदेडकरांना यानिमित्ताने अनुभवयास मिळाला.


ना. हेमंत पाटील यांच्यावतीने घेण्यात येणारा आषाढी महोत्सव हा सांगीतिक कार्यक्रम नांदेडकरांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी असायचा. गेल्या काही वर्षात हा कार्यक्रम खंडित झाला आहे. “तेरे सूर और मेरे गीत” या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर, आषाढी महोत्सव पुन्हा सुरू करण्याची इच्छा निर्माण झाली असून लवकरच आषाढी महोत्सव सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही नामदार हेमंत पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
मेघा संजीवन: शास्त्रीय पद्धतीच्या गीतांसह सर्व प्रकारचे गायन !
येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन ह्या शास्त्रीय संगीताच्या गायिका आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचा बाज असणाऱ्या ‘देवदास’ चित्रपटातील ठुमरी वर आधारित ‘ढाई शाम रोक लई’ अशा गीतांसह ‘रोज शाम आती थी’, ‘दो लब्जो की है’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘जाने जा ढूंढता रहा, ‘वादा करो नही छोडेंगे तेरा साथ’, ‘ये काली काली आंँखे’, ‘अखियो को रहने दो’, ‘इतीसी हसी इतीसी खुशी’ अशी भिन्न प्रकारची अनेक नवीन हिंदी गीतेही त्यांच्या नेहमीच्या सुरेल आवाजात दमदारपणे सादर केली. मेघा संजीवन यांनी या कार्यक्रमात महिला गायिकांच्या आवाजातील, एकटीने तब्बल वीसहून अधिक सादर केलेली गाणी सर्वांच्या कुतूलाचा विषय ठरली होते .
स्टार गिटारिस्ट रॉनी सातमकर आणि सिंगर चँग
गायिका आशा भोसले, श्रेया घोषाल, सोनू निगम, जावेद अली यांना साथ संगीत करणारे स्टार गिटारिस्ट रॉनी सातमकर यांच्या गिटार वादनाने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. विविध नव्या जुन्या चित्रपटातील गीतांना गिटारची साथ देतानाच रॉनी सातमकर यांनी यांनी खास सादर केलेले गिटार वादन रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. त्याचबरोबर आपल्या आगळे वेगळ्या पद्धतीने थिरकत गीते सादर करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सिंगर चँग यांच्या विविध गीतांनी कार्यक्रमात उत्साह भरला. त्यांनी ‘निले निले अंबर पर’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘अरे दिवानो मुझे पहचानो’, ‘ये काली काली आँखे’, ‘जाने जा ढूंढता रहा’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ अशी विविध गायकांच्या आवाजातील गीते आपल्या खास शैलीत सादर केली.
संपादक केशव घोणसे पाटील: जुनी आणि नवीन गीते!
पत्रकारितेचा पिंड असलेले दैनिक ‘गोदातीर समाचार’चे संपादक केशव घोणसे पाटील यांचे गेल्या काही काळातील गायन क्षेत्रातील पाऊल सर्वांसाठीच कुतूहल ठरले आहे. मागच्या कार्यक्रमाप्रमाणे या कार्यक्रमातही त्यांनी दर्जेदार गीते सादर केली. मेघा संजीवन यांच्या साथीने त्यांनी सादर केलेले ‘इन हसीन वादियों से’ हे सुरेश वाडकर यांच्या आवाजातील, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील, ‘जिंदगी की, न तुटे लडी’ हे नितीन मुकेश यांच्या आवाजातील युगलगीतं तसेच आशिकी चित्रपटातील कुमार सानू यांच्या आवाजातील ‘तू मेरी जिंदगी है’ या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीते गाण्यासाठी प्रसिद्ध असणारे येथील गायक मंजूर हाश्मी यांच्यासह विजय बंडेवार, डॉ. हंसराज वैद्य, डॉ.सिद्धार्थ एम. जोंधळे, सावजी दुमाने यांनी विविध गीते सादर करून या कार्यक्रमावर आपली छाप पाडली. केवळ नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आपल्या खास निवेदनासाठी प्रसिद्ध असणारे लेखक, निवेदक प्रा. संतोष देवराये यांनी या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. अनावश्यक आणि रटाळ भाष्य न करता मुद्देसूद आणि योग्य शब्दात निवेदनासाठी प्रसिद्ध असणारे प्रा. देवराये यांचे सूत्रसंचालन सर्वांनाच भावले.


