नांदेड| मानवाला पचंद्रियांमुळे ज्ञान प्राप्त होते. परंतु सम्यक दृष्टी सद्विवेकाला जन्म देते. अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. ती मिथ्या दृष्टीची विरोधीनी आहे. खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी मानवाचे अज्ञान घालवते असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. ते खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, आंबेडकरवादी मिशन केंद्रप्रमुख दीपक कदम, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे, अशोक धुतराज, संजय गच्चे, प्रा. मधुकर जोंधळे, नायब तहसिलदार झगडे, संदेश वाठोरे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. विनायक लोणे, प्राचार्य श्याम रोकडे, रामानंद सावंत, इंजि. भरतकुमार कानिंदे, प्रज्ञाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प व दीप पूजन करून अभिवादन करण्यात आले. याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. तसेच त्रिरत्न वंदना घेण्यात आली. सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, भोजनदान, दान पारमिता, बुद्ध भीम गितांची वंदना आदी कार्यक्रम यानिमित्ताने घेण्यात आले.
यावेळी पंधरा दिवस चाललेल्या ४० श्रामणेर श्रामणेरी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. कनिष्क जोंधळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी व प्रशिक्षण शिबिरार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक साहेबराव इंगोले यांनी केले तर आभार भरतकुमार कानिंदे यांनी मानले. यावेळी विविध ठिकाणांहून बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका यांची उपस्थिती होती.