देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर (ता. देगलूर) मौजे मडगी शिवारातील लेडी नदीच्या पात्रात आज (दि. ३१) दुपारी एका अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना महापुर आला आहे. त्याच पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका पुरुषाचे प्रेत मडगी शिवारातील नदी पात्रात आढळून आले.


या घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासात मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ५० वर्षे, बांधा मजबूत, उंची साधारण ५.५ फूट, अंगात काळी पॅन्ट, उजव्या हातात स्टीलचे कडे, कमरेला करदोडा व पाय नागवे असल्याचे निदर्शनास आले.


सदरील प्रेताचे शवविच्छेदन करून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कणकवळे करीत आहेत.



