नांदेड | मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली. हा कार्यक्रम नांदेड रेल्वे स्टेशनवर झाला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी केंद्रीय व राज्य मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित राहतील.


ही गाडी मूळ जालना – मुंबई सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार असून आता ती हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. या गाडीचा क्रमांक २०७०५/२०७०६ असा असून ती नांदेड व मुंबईदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून ही गाडी बुधवारी सुटणार नाही, तर मुंबईहून ती गुरुवारी सुटणार नाही.


प्रवास अधिक वेगवान व आरामदायी
एकूण ६१० किलोमीटर अंतर ही गाडी ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. वंदे भारतमध्ये २० डबे असून त्यात २ एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १८ चेअरकारसह एकूण १४४० आसन क्षमता आहे. ऑन-बोर्ड वाय-फाय, इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, बायो व्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉईंट, यूव्ही लॅम्पसह एअर कंडिशनिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.


पर्यटन व धार्मिक स्थळांना मोठा लाभ
या गाडीच्या धावण्यामुळे नांदेड येथील सचखंड हजूर साहिब गुरुद्वारा, जालना येथील राजूर गणपती, छत्रपती संभाजीनगरजवळील घृणेश्वर ज्योतिर्लिंग, अजिंठा-वेरूळ लेणी, तसेच मनमाडमार्गे शिर्डी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांशी सेमी-हायस्पीड रेल्वेने थेट संपर्क साधला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पर्यटन आणि यात्रेकरूंच्या सोयींना मोठा फायदा होणार आहे.

उद्घाटनाचे वेळापत्रक (२६ ऑगस्ट २०२५)
हजूर साहिब नांदेड प्रस्थान – 11.20 वाजता
परभणी – 12.18/12.20
जालना – 13.58/14.00
औरंगाबाद – 14.48/14.50
मनमाड – 17.33/17.35
नाशिक रोड – 18.33/18.35
कल्याण – 20.43/20.45
ठाणे – 21.03/21.05
दादर – 21.25/21.27
मुंबई सीएसएमटी आगमन – 21.55 वाजता
नियमित सेवा वेळापत्रक
गाडी क्रमांक 20705 – नांदेडहून सकाळी ५.०० प्रस्थान करून दुपारी २.२५ वाजता मुंबई सीएसएमटीला आगमन. गाडी क्रमांक 20706 – मुंबई सीएसएमटीहून दुपारी १.१० प्रस्थान करून रात्री १०.५० वाजता नांदेडला आगमन. मराठवाड्याला राज्याची राजधानी मुंबईशी उच्च-गती कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे हा प्रदेशाच्या आर्थिक, पर्यटन व सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


