हिमायतनगर/नांदेड| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधी मिळण्यासाठी वाळकेवाडी- दुधड-सोनारी-पोटा (बु.) च्या वनजमिनीतील दर्गा व मंदिरांना तिर्थक्षेत्र /तिर्थस्थळ तसेच,वन पर्यटनासाठी प्रशासनाकडून सकारात्मक भूमीका घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी भरपावसात सोनारीफाटा येथे सुरु केलेले आमरण उपोषण तुर्त स्थगित केले.


सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री.सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि.नांदेड) येथिल वनजमिनींचे एकत्रित संपादन करुन वाळकेवाडी- दुधड- सोनारी- पोटा बु.येथे वनपर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी वनविभागाकडून नव्याने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन मंदिर परिसराच्या त्याच बरोबर,या वनजमीनीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य योजना निसर्ग पर्यटन (२४०६ २२९५) अंतर्गत या वन/निसर्ग पर्यटनाचा तातडीने समावेश करुन शासन स्तरावरुन त्यासाठी तात्काळ निधी तरतुद व उपलब्धता करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागाकडे करुन राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी,मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी श्री.हरहरेश्वर मंदिर पायथ्या शेजारील रस्त्यालगत, सोनारी फाटा येथे आमरण उपोषणास बसले होते.

दरम्यान हिमायतनगर तहसीलदारांनी याबाबत वरिष्ठांना अवगत केले तर, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांनी संबधित ग्रामपंचायत अधिकार्यांना तिर्थक्षेत्र व तिर्थस्थळाचे तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले. वनविभागाच्या तेंदू व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक भारत , अप्पाराव पेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी ऊमेश ढगे,नांदेडफिरते पथकचे वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णा राठोड यांच्या उपस्थितीत हिमायतनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कदम यांनी दिलेल्या लेखी पत्रात याठिकाणची वनजमिन एकत्रित संपादन करुनच वरिष्ठांना तातडीने वनपर्यटनाचा प्रस्ताव सादर करु असे स्पष्ट केले. त्यानंतर,भवरे यांनी आपले आमरण उपोषण तुर्त स्थगित केले.


यावेळी बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,सरसमचे राम गुंडेकर, संतोष पिन्नलवार, शेख खय्युम,गौतम राऊत, सोनारीचे उपसरपंच सय्यद यूनुस,पोटा (बू.)चे मा.उपसरपंच संतोष पुल्लेवार, नागेश कांबळे, शिवाजी डोखळे,अविनाश कदम,आनंदा जळपते, परमेश्वर वालेगांवकर, केशव माने,विजय वाठोरे आदींची उपस्थिती होती. या उपोषणास परिसरातील नागरिक, पत्रकार व अनेक लोकप्रतिनिधींसह सामाजिक-राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवीला.

मुख्यमंत्री कार्यालयाची कर्तव्यतत्परता !
महत्वाचे म्हणजे,राज्याचे मूख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून वनविभागाचे सचिव मिलींद म्हैसकर यांना तर,त्यांनीही संबधितांना तातडीने ई-मेल संदेशातून कार्यवाहीचे आदेश देत आपली कर्तव्यतत्परता दाखविली.

