
श्रावणसरींनी, धरणी चिंब ओली,
रंगांची उधळण, नभांगणी खुलली.
हसून मोहरली, हिरवळ सारी,
मनात चैतन्याची, नवी लहर उतरली.


श्रावण… नुसतं नाव ऐकलं तरी मन कसं शांत आणि प्रफुल्लित होतं. चैतन्याची एक नवीन लहर मनाला स्पर्श करून जाते. हा महिना केवळ निसर्गाचा उत्सव नाही, तर मानवी जीवनात नवसंजीवनी आणणारा एक अनमोल सोहळा आहे. चैत्र-वैशाखातील तीव्र उन्हाळा आणि आषाढातील धो-धो कोसळणाऱ्या सरींनंतर श्रावण येतो तोच मुळी आपल्यासोबत एक वेगळीच शांतता घेऊन. तो फक्त पाऊस घेऊन येत नाही, तर निसर्गाला आणि मनालाही नव्याने सजवून जातो. हिरवीगार सृष्टी, संततधार पाऊस आणि सणांची रेलचेल असलेला हा महिना खऱ्या अर्थाने आपल्या अंतरंगाला शांत करून बाह्य जीवनातही आनंद फुलवतो.

श्रावणात सर्व सृष्टी जणू नटूनसजून हिरवा शालू परिधान करते. डोंगर, दऱ्या, शेतं, माळराने… सर्वत्र हिरवंगार गालिचे पसरलेले दिसतात. पावसाच्या थेंबांनी न्हाऊन निघालेली झाडे, वेली आणि फुले अधिकच टवटवीत दिसतात. या महिन्यात पावसाच्या हलक्या सरी आणि अचानक डोकावणारे ऊन यांच्या लपाछपीचा खेळ सुरू असतो. क्षणात रिमझिम पाऊस येतो आणि दुसऱ्या क्षणात सोनेरी ऊन पडते. हा निसर्गाचा खेळ मानवी जीवनातील सुख-दुःख, लाभ-हानी, चढ-उतार यांचा सुंदर पाठ शिकवतो.


आषाढाची काजळी, श्रावणाने पुसली,
नव्या चैतन्याची, लहर ही रुजली.
नभीच्या रंगात, जीवन बहरले,
सृष्टीच्या कुशीत, मन हे रमले.

श्रावणातील निसर्गरम्य दृश्ये ही मनातील नैराश्य दूर करतात. उंच पर्वतांवरून खळाळणारे धबधबे, हिरव्यागार शेतांमध्ये डोलणारी पिके आणि त्यातील मंद वाऱ्याची झुळूक मनाला एक वेगळाच आनंद देतात. आकाशातील ढग आणि वारा यांचा मनोहारी संगम पाहण्यासारखा असतो. श्रावणात आकाशात उमटणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य म्हणजे निसर्गाने दिलेले एक अमूल्य वरदानच! हे इंद्रधनुष्य मानवी मनाला आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देते. मोराचा मनमोहक पिसारा फुलवून केलेला ‘थुई थुई’ नाच आणि कोकिळेचा मधुर स्वर हे सारे श्रावणाचेच वैभव आहे.
केवळ निसर्गाचे बाह्य सौंदर्यच नाही, तर श्रावण महिना आपल्या अंतरंगालाही शांत करतो. आषाढात शेतीची कामे संपलेली असल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग निवांत असतो. या काळात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. उपवास, जप, तप आणि धार्मिक ग्रंथांचे पठण यांमुळे मनाला शांती आणि आत्मिक आनंद मिळतो. ‘उपवास’ या शब्दाचा खरा अर्थ ‘ईश्वराच्या जवळ राहणे’ असा आहे. या महिन्यात अनेक सण येतात जसे की नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन आणि पोळा. हे सण आपल्याला निसर्गाशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात.
मराठी साहित्य आणि कलेतील श्रावण
मराठी साहित्यात श्रावणाचे स्थान अनमोल आहे. हा महिना म्हणजे कवी आणि गीतकारांसाठी एक प्रेरणास्थान. बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ पासून ते मंगेश पाडगावकरांच्या ‘श्रावणात घन निळा बरसला’ यांसारख्या अजरामर कवितांनी मराठी साहित्यात श्रावणाचे सौंदर्य अधिक खुलवले आहे. कवयित्री इंदिरा संत यांना श्रावणाचे सौंदर्य एखाद्या मनस्वी चित्रकाराने चितारलेले वाटते, ज्यात स्पंदने आणि जिवंतपणा आहे. तर शांता शेळके यांनी ‘रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला’ या गीतामधून श्रावणातील विरह भावनांना शब्दरूप दिले. ही गीते आणि कविता केवळ निसर्गाचे वर्णन करत नाहीत, तर मानवी मनातील हळव्या आणि प्रेमळ भावनांनाही स्पर्श करतात. श्रावणातील पाऊस, ऊन-सावलीचा खेळ, इंद्रधनुष्याचे रंग आणि हिरवीगार सृष्टी ही सारी प्रतीके मराठी काव्यात आणि गीतांमध्ये विविध रूपांत व्यक्त झाली आहेत, ज्यामुळे श्रावण मराठी रसिकांच्या मनावर कायमची छाप उमटवून गेला आहे.
रिमझिम सरींनी, सृष्टी ही न्हाली,
डोंगर दऱ्यांत, हिरवळ ही उगवली.
मोराचा पिसारा, गाणे कोकिळेचे,
श्रावण हेच, सुखाचे गीत आहे.
मी आणि रसिक श्रोत्यांसाठी श्रावण
श्रावण महिना प्रेमी युगुलांसाठी एक खास पर्वणी ठरतो. रिमझिम बरसणाऱ्या श्रावणसरी, हिरवेगार झालेले डोंगर आणि शांत, आल्हाददायक वातावरण प्रेमभावनांना अधिक बहर आणते. अशा वेळी एकत्र भिजण्याचा, लांबच्या पायवाटांवरून फिरण्याचा, किंवा शांत ठिकाणी बसून निसर्गाच्या सोबतीने गप्पा मारण्याचा आनंद काही औरच असतो. श्रावण हा विरहाचा महिना असला तरी, तो मिलनाचाही साक्षीदार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाण्यांमध्ये श्रावणाचे हे प्रेमळ आणि हळुवार रूप टिपले आहे. सुमन कल्याणपूरकर यांच्या मधुर आवाजातील ‘झिमझिम झरती श्रावणधारा’ यांसारखी अनेक गाणी श्रावणाचे प्रेमळ आणि रोमँटिक रूप दर्शवतात, ज्यामुळे रसिक श्रोत्यांच्या मनात श्रावण अधिकच रुळतो. श्रावणाचे हे निसर्गसौंदर्य, त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि मानवी मनाला देणारे शांतता व चैतन्य यामुळेच हा महिना खऱ्या अर्थाने ‘चैतन्यदायी’ ठरतो.
श्रावण आपल्याला शिकवतो की जीवनातील साधेसुधे आनंदही किती महत्त्वाचे आहेत आणि निसर्गाशी असलेले आपले नाते किती पवित्र आहे. म्हणून श्रावणात निसर्गाच्या कुशीत विसावणे आणि त्याच्या सौंदर्याचा अनुभव घेणे हे खऱ्या अर्थाने आत्मिक सुख देणारे ठरते.
…राहूल हरिभाऊ इंगळे पाटील, मोबाईल ९८९०५७७१२८



