Energizing Shravan : चैतन्यदायी श्रावण, खुलवी अंतर्बाह्य जीवन!
श्रावणसरींनी, धरणी चिंब ओली,
रंगांची उधळण, नभांगणी खुलली.
हसून मोहरली, हिरवळ सारी,
मनात चैतन्याची, नवी लहर उतरली.
श्रावण... नुसतं नाव ऐकलं तरी मन कसं शांत आणि प्रफुल्लित होतं. चैतन्याची एक नवीन लहर मनाला स्पर्श करून जाते. हा महिना केवळ निसर्गाचा उत्सव नाही, तर मानवी जीवनात नवसंजीवनी आणणारा एक अनमोल सोहळा आहे. चैत्र-वैशाखातील तीव्र उन्हाळा आणि आषाढातील धो-धो कोसळणाऱ्या सरींनंतर श्रावण येतो तोच मुळी आपल्यासोबत एक वेगळीच शांतता घेऊन. तो फक्त पाऊस घेऊन येत नाही, तर निसर्गाला आणि मनालाही नव्याने सजवून जातो. हिरवीगार सृष्टी, संततधार पाऊस आणि सणांची रेलचेल असलेला हा महिना खऱ्या अर्थाने आपल्या अंतरंगाला शांत करून बाह्य जीवनातही आनंद फुलवतो.
श्रावणात सर्व सृष्टी जणू नटूनसजून हिरवा शालू परिधान करते. डोंगर, दऱ्या, शेतं, माळराने... सर्वत्र हिरवंगार गालिचे पसरलेले दिसतात. पावसाच्या थेंबांनी न्हाऊन...
