अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीने यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या “ नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार ”चे पहिले पुरस्कारार्थी म्हणून समाजसेवेतील अखंडित योगदानाबद्दल धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना सिनेदिग्दर्शक योगेश सोमण,अ.भा.विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्त जोशी व संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला १०२ पुरस्कार मिळाल्याची पहिल्यांदाच घटना घडल्यामुळे विक्रमवीर ॲड.ठाकूर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


मंगळवारी नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव या रंगतदार समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा.शेषराव मोरे,संस्थेचे सचिव ॲड.वनिता जोशी,कोषाध्यक्ष कैलासचंद्र काला,सहसचिव धनंजय जोशी,प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.मराठवाड्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दिलीप ठाकूर, डॉ.संतोष मालपाणी.डॉ. मुकुंद कळंबेकर, डॉ. मल्हार लाटकर यांचा गौरव करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह व शाल पुष्पहार व ग्रंथ देऊन दिलीप ठाकूर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.


प्रभावी सूत्रसंचालन करणारे डॉ. मनीष देशपांडे यांनी दिलीप ठाकूर यांना पुरस्कारासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतांना असे सांगितले की,” आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाचा गौरव करणार आहोत, ज्यांनी गेली दोन दशके समाजसेवा म्हणजेच आपले जीवनकार्य मानले आहे.२२ वर्षांमध्ये त्यांनी १५ लाखांहून अधिक जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत.


हे ऐकूनच आपल्या मनात एकच भावना निर्माण होते — “धन्य तो माणूस!”नांदेड येथील धर्मभूषण अॅड. दिलीपभाऊ ठाकूर — एक नाव, एक मिशन, एक प्रेरणा! गेल्या ६१ महिन्यापासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी, जे रस्त्यावर जगत आहेत… जे असहाय, दुर्बल आहेत… ज्या बांधवांनी आपले मानसिक संतुलनही गमावले आहे… अशा प्रत्येकाला त्यांनी आपले मानले आहे.त्यांना एकत्र करून त्यांची केस-दाढी करताना, स्वच्छ पाण्याने अंघोळ घालताना, त्यांना नवीन कपडे आणि १०० रुपयांची मदत देताना — त्या कायापालट दृश्याला पाहणारे डोळे अश्रूंनी भरून येतात.

गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात ४० मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर फिरून बेघर लोकांना उबदार चादरी वाटल्या आहेत — १४००० च्यावर!पावसाळ्यात ‘कृपाछत्र’ उपक्रमातून १२,००० हून अधिक छत्र्या… उन्हाळ्यात ‘चरण सेवा’तून शेकडो लोकांना चप्पल…हे कार्य केवळ सेवा नाही, ही खरी मानवतेची पूजा आहे.तिन्ही ऋतूंमध्ये गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या दिलीप भाऊंनी एक वेगळाच उपक्रम सुरू केल
“भाऊचा माणुसकीचा फ्रिज”.या फ्रिजमध्ये दररोज ४० ते १२० डबे ठेवले जातात, जे गरीब, उपाशी लोकांसाठी आयुष्याचा आधार ठरतात.धर्म आणि आरोग्यप्रती जनजागृतीसाठी त्यांनी सत्यगणपती, औंढा नागनाथ, माहूर, रत्नेश्वरी इत्यादी अनेक पदयात्रांचे नेतृत्व केले आहे.२६ वर्षे अमरनाथ यात्रा करून शेकडो ज्येष्ठ नागरिकांना दर्शन घडवले.हरिद्वार-वाराणसी प्रमाणे नांदेडमध्ये गोदावरी गंगा पूजेचे भव्य आयोजन करत, हजारो महिलांना अध्यात्माशी जोडले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळापाणी भोगलेल्या अंदमानच्या सेलूलर जेल ला दरवर्षी शेकडो सावरकर भक्तांना घेऊन जातात.
जयस्तुते श्रीमहान मंगले हे अजरामर गीत त्यांनी १५००० फुटावर विमानात स्वतः तर गायलेच पण विमानातील सर्व प्रवाशांकडून गाऊन घेण्याचा पहिला विक्रम केला. दिलीपभाऊंनी गेली ४० वर्षे एक क्षणही न दवडता सेवा केली आहे.आणि म्हणूनच आज, अशा समाजसेवेसाठी झपाटलेल्या, निःस्वार्थ सेवेला आयुष्य समजणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार स्विकारण्यासाठी मी अत्यंत आदरपूर्वक मंचावर आमंत्रित करतो”.यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडात करुन दाद दिली.
पुरस्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, बालासाहेब पांडे यांच्या हस्ते यापूर्वी मला देवदूत हा सतरावा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की,तुला शंभर पुरस्कार मिळाल्यानंतर विशेष पुरस्कार आम्ही देणार आहोत.ते आश्वासन नव्हते हे आज स्पष्ट झाले.आत्तापर्यंत मिळालेले १०२ पुरस्कार हे माझे स्वतःचे नसून मला सहकार्य करणाऱ्या संपूर्ण नांदेडकरांचे आहेत. हा पुरस्कार मिळाल्यामुळे आपली योग्य दिशेने वाटचाल होत असल्याची प्रचिती येत असून आणखी कार्य करण्याची ऊर्जा मिळते या शब्दात संयोजकांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष कोटुरवार यांनी तर आभार डॉ. शंतनु कस्तुरे यांनी मानले.दिलीप ठाकूर यांना विक्रमी १०२ वा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य सुधीर शिवनीकर, उपप्राचार्य दीपक कासराळीकर व अजय संगेवार, ज्येष्ठ छायाचित्रकार विजय होकर्णे, ज्येष्ठ पत्रकार नरेश दंडवते व कृष्णा उमरीकर, प्रा. शंकर परकंटे, प्रवीण साले, राजेश केंद्रे, अनिलसिंह हजारी, अपर्णा चितळे, संतोष परळीकर, तात्याराव पाटील,प्रा. राम शेळके, शैलेंद्र वडजकर, सुभाष देवकत्ते,शंकर कासटवार, संतोष बच्चेवार, राजेशसिंह ठाकूर यांच्यासह अनेक उपस्थितांनी अभिनंदन केले.
शतकेपार पुरस्कार
गेल्या अनेक वर्ष्यापासून दिलीप ठाकूर हे वर्षभरात तब्बल ९० जगावेगळे उपक्रम राबवितात.त्यामध्ये भाऊचा माणुसकीचा फ्रिज,क्षुधा शांती, लायन्सचा डबा हे ३ उपक्रम वर्षभरातील ३६५ दिवस अखंडीत पणे सुरु आहेत. त्यांनाआतापर्यंत देशविदेशातून १०२ पुरस्कार मिळवलेले आहेत.
त्यामध्ये धर्मभूषण पदवी,गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृति पुरस्कार,लायंस एप्रिसिएशन अवार्ड,महाराष्ट्र रत्न, लोकशाही मराठवाडा रत्न, मराठवाडा भूषण, शान ए नांदेड,देवदूत उपाधी,कर्मयोगी पुरस्कार,नांदेड के सांता,इन्स्पायर पर्सनॅलिटी अवॉर्ड,ज्योतिष्य महर्षी पाराशर स्मृती पुरस्कार, गुणीजन गौरव पुरस्कार, सन्मान पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार, बेस्ट सिग्नेचर ऍक्टिव्हिटी, कोरोना सेवा योद्धा पुरस्कार.
इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन नॅशनल अवार्ड,तिरंगा गौरव पुरस्कार,अखंड सेवावृत्ती पुरस्कार,कोरोना योद्धा, कार्य सन्मान पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मान, दिनबंधू सेवा पुरस्कार, कोविड योद्धा, समाजभूषण पुरस्कार, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, मा जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभावी पुरस्कार, मातोश्री गंगुबाई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, रेअर अवॉर्ड.
कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय अनुग्रह पुरस्कार, लायन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवॉर्ड, सेवा सादगी सदाचार पुरस्कार, मानवता रक्षक पुरस्कार, ऊर्जा गौरव पुरस्कार, कार्य अभिमान पुरस्कार, कृतज्ञता सेवा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, कृतज्ञता उत्सव,मानवता के सेवक पुरस्कार, कोरोना योद्धा गौरव ,इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड, आज का कर्मवीर , शिवरत्न पुरस्कार ,संवेदना राष्ट्रीय पुरस्कार, नंदिग्राम एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी देशभरातील विविध संस्थांनी सन्मान केला आहे. शतकेपार पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

