नांदेड| जलजीवन मिशन व स्वच्छता अभियानांतर्गत नारायण मिसाळ यांनी कोणतेही काम माझे नाही असे न म्हणता, प्रत्येक काम कार्यक्षमतेने पार पाडले. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर ही त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी काढले.


जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नारायण मिसाळ यांची बदली परभणी जिल्हयातील पुर्णा पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी म्हणून झाली. यानिमित्त आज जिल्हा परिषद नांदेडच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ मेघना कावली होत्या. कार्यक्रमास जलजीवन मिशनचे प्रभारी प्रकल्प संचालक अमित राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, नारायण मिसाळ यांची कार्यपद्धती तालुकास्तरावरही प्रेरणादायी ठरेल. गुगल शिट, गुगल फॉर्म, एक्सेल शिटमधून अचूक माहिती संकलन व सादरीकरण यामध्ये त्यांचा हातखंड आहे. तांत्रिक साधनांचा वापर करून त्यांनी योजना अंमलबजावणीत पारदर्शकता आणली, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नारायण मिसाळ यांचा शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना नारायण मिसाळ म्हणाले, नांदेड जिल्हा हा प्रेमळ जिल्हा आहे. या ठिकाणी मला वर्षा ठाकूर-घुगे, मिनल करनवाल आणि मेघना कावली यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या सीईओंसोबत काम करण्याची संधी मिळाली. माझ्या सहकाऱ्यांच्या अथक सहकार्यामुळे मी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकलो. पुर्णा येथे हीच ऊर्जा घेऊन काम सुरू करीन, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रभारी प्रकल्प संचालक अमित राठोड तसेच अधीक्षक अल्केश शिरशेटवार यांची किनवट पंचायत समिती येथे बदली झाल्याबद्दल तर किनवट येथून जिल्हा कक्षात नव्याने रुजू झालेल्या पुष्पलता पवार यांचेही स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात चैतन्य तांदूळवाडीकर, महेंद्र वाठोरे, सुशील मानवतकर, विठ्ठल चिगळे, नागेश स्वामी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

