Water supply : हदगावला एक ना अनेक समस्यांनी ग्रासल..! ४७ कोटींची पाणीपुरवठा योजना थंड बसत्यात

हदगाव, शेख चांदपाशा| राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात जुना तालुका म्हणून ओळख असलेल्या हदगाव तालुक्यातील १७७ गावांचा थेट संबंध हदगाव शहराशी आहे. राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्यामुळे या परिसराचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ठेकेदारांच्या फायद्यासाठी गरज नसताना उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलांनी शहराचे विद्रूपकरण केले असून, या पूलांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.


हदगाव शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. १९५२ मध्ये नगरपरिषद स्थापन होऊनही आजतागायत शहरात मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. विशेषतः कोट्यावधी रुपये खर्च करून (जल शुद्धीकरण प्रकल्प)…. आणखीनच सुरू झालेला नाही. शुद्ध पाणी ही आजही दूरची गोष्टच आहे. ४७ कोटी रुपयांची पाणी योजना गेली तीन वर्षे संथ गतीने रेंगाळलेली आहे. ही योजना कधी पूर्ण होईल. याचे भाकितही कोणी देऊ शकत नाही. आ. बाबूराव क कोहळीकर यांनी हे प्रश्न विधानसभेत उपस्थित करतील, अशी अपेक्षा होती. पण जनतेला केवळ निराशाच पदरात पडली आहे.

औद्योगिकीकरण केव्हा होणार…?
हदगाव तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी शहरालगत ३५ हेक्टर क्षेत्र औद्योगिक वसाहती साठी आरक्षित करण्यात आले होते. मोठ मोठी सूचना फलकही लावण्यात आले, पण आजतागायत एकाही उद्योगाची स्थापना झाली नाही. उलट ही जमीन खासगी भूखंडांमध्ये रूपांतरीत होऊ लागली आहे. आजही शहरात प्रवेशासाठी निजामकालीन एकच मुख्य रस्ता आहे. तालुक्यातील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार उच्चांकी गाठलेला असून, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.


सध्याच्या लोकप्रतिनिधींनी ह्या गंभीर विषयांवर विधानसभेत आवाज उठवावा, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा अपुरीच राहिली. त्यामुळे येणाऱ्या काळात नवीन नेतृत्व हदगाव तालुका व शहराला समस्यांमुक्त करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहे.




