यात्रेचे अखेरचे क्षण… स्मरणरंजनाचा सोहळा
अमरनाथ यात्रेचे शेवटचे दोन दिवस उजाडले होते. पहाटे तीनला वेक-अप कॉल… पण हॉटेल ‘नय्यर’ मधील विश्रांतीमुळे उठायला कोणालाही आळस वाटला नाही. प्रत्येकाने ₹२०० देऊन ऑटो केले, आणि वेळेत पोहोचलो अमृतसर रेल्वे स्थानकावर. पावणे पाचला शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली. रेल्वेने दिलेला नाश्ता नुकताच संपला, इतक्यात लुधियानात कुलदीपसिंह सरदारजीने छोले-कुलचे प्रेमाने भरवले. त्यांचा आग्रह नाकारणं अशक्यच होतं!


दिल्ली – उकाड्यातून थेट आदरातिथ्याच्या सजीव छायेत!
सकाळी अकरा वाजता पोहोचलो दिल्लीला… प्लॅटफॉर्म १ वर उतरून, १६ वर असलेल्या पार्किंगपर्यंत पोहोचणं म्हणजे सामानाच्या युद्धात उतरणं! हमालांचे दर गगनाला भिडले, पण राजूभाऊंच्या हुशारीने “नाटक केले – बॅग उचलण्याचे” आणि दर गडगडले! वरुणराजाची कृपा झाली – पावसाच्या सरी कोसळल्या आणि दिल्लीचं वातावरण सुखावलं. लाल किल्ला, इंडिया गेट, राजघाट, त्रिमूर्ती भवन, पंतप्रधान निवास… इतिहासाचे हुंकार आणि वर्तमानाचं वैभव यांचा मिलाफ अनुभवला.


खा. गोपछडे यांचं ‘दिल्लीतील स्वागतसत्कार’
दुपारी आमचं भोजन होतं गुजरात भवनात – खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या सौजन्याने संजीवकुमार अधिकारी स्वतः स्वागतासाठी उभे होते. दिल्लीकर महिलांनी यात्रेकरूंना हळदी-कुंकवाने सन्मानित केलं. अवतारसिंह जी, अजितसिंह जी, वेणू गोपालजी, ओशो कालिया आणि अनेक मान्यवरांनी सिरोपाव घालून स्वागत केलं. खा. गोपछडे यांनी मोबाईल संवादात म्हटलं दिलीपभाऊंच्या २५व्या यात्रेत सहभागी होणं, ही आमची आध्यात्मिक सेवा आहे.” त्यानंतर सामूहिक प्रार्थना आणि भजनांनी वातावरण अधिक भाविक आणि भक्तिरसात न्हालं.


राष्ट्रपती भवन – सत्तेच्या हृदयाशी भेट
माझा मित्र सिकंदर, खासदारांचा ड्रायव्हर, भेटायला आला. त्याच्या प्रयत्नांनी आम्हाला VIP पासेसवर राष्ट्रपती भवन दर्शन लाभलं! ३२० एकरांचं हे भव्य वास्तूशिल्प, ३४० खोल्या, मोगल गार्डन आणि ऐतिहासिक गौरव घेऊन समोर उभं होतं. भारताच्या राष्ट्रध्वजासारखंच याचं वैभव डोळ्यात भरून आलं!

कुतुबमिनार – इतिहासाचा साक्षात साक्षीदार
पुढचा टप्पा – कुतुबमिनार प्रत्येकी ₹४० देऊन प्रवेश केला. ११९९ ते १३६८ दरम्यान उभारलेला हा विजय बुरूज, ३९९ पायऱ्यांनी सजलेला, इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. शिलालेख, भौमितिक नक्षीकाम, तुघलकांची रचना… हे सर्व पाहताना इतिहासाला स्पर्श केल्यासारखं वाटलं.
परतीचा प्रवास – आठवणींचा गाठोडा
रात्री ८:३० ला निजामुद्दीन स्टेशन गाठलं.प्रसिद्ध हास्यकवी प्रताप फौजदार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रुचकर भोजनाची मेजवानी!मुकेश चिकारा यांनी स्वादिष्ट जेवण दिलं, त्यांचा सत्कार ट्रॉफी देऊन करण्यात आला. रात्र झाली… ११ वाजता मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेसने आम्ही पुन्हा नांदेडकडे रवाना झालो… (क्रमश 🙂


