नांदेड| गेल्या काही वर्षांपासून नांदेड शहराची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे . रस्ते खराब झाले आहेत. वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य, रहदारी आणि मूलभूत सोयी सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला असल्याने नांदेड शहराच्या आगामी २० वर्षांतील सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करण्यात यावा, अशी ठाम मागणी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे बैठक लावून निधी प्राप्त करून घेण्याचे अनुषंगाने ही प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे खा. डॉ. गोपछडे यांनी व्यक्त केली. गुरु गोविंदसिंग यांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या नांदेड शहराला धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही नांदेडवर मोठी आस्था आहे .

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा नांदेडला आल्यानंतर पवित्र गुरुद्वारात आपला माथा ठेकून आशीर्वाद घेत असतात. त्यामुळे नांदेडकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. देश-विदेशातून हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या या शहरात राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचे केंद्र, मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय शिक्षणसंस्था व प्रवेश केंद्रे असल्यामुळे शहरावर सतत लोकवस्तीचा ताण आहे. नांदेड शहराचे वैशिष्ट्य ओळखून, हॉलिसिटी आराखड्यातून पुढील २० वर्षांतील गरजा लक्षात घेऊन सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याची नितांत गरज आहे, असे मत डॉ. गोपछडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.


या आराखड्यातून नांदेडला वाहतूक सुलभीकरण, पर्यावरण स्नेही पायाभूत सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, हरित क्षेत्र वाढ, तसेच धार्मिक व शैक्षणिक पर्यटन केंद्र म्हणून आधुनिक स्वरूपात विकसित करण्याचा विचार आहे. सध्या नांदेडची लोकसंख्या १० लाखांच्या पुढे गेली असून स्थायिकां सोबत स्थलांतरितांचीही संख्या वाढत आहे. परिणामी पायाभूत सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रिसर्च रिसोर्स सेंटर, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने होलिसिटी प्रकल्पाचे अभ्यासाधिष्ठित नियोजन करण्यात यावे, अशी विनंती खा. गोपछडे यांनी केली आहे. नांदेड शहराचा समावेश केंद्र शासनाच्या “होलिसिटी” (Holistic City Development) प्रकल्पात करून शहराचा सर्वांगीण आणि आधुनिक दृष्टीकोनातून विकास साधावा, या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

दरम्यान उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी नांदेडच्या विकासासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक असून, आगामी काळात निधी आणि योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले. यावेळी बैठकीला पालकमंत्री अतुल सावे , माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, नामदार हेमंत पाटील , खा.प्रा. रवींद्र चव्हाण, आ. बालाजीराव कल्याणकर , आ.आनंदराव बोंढारकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
होलिसिटी प्रकल्पाची आवश्यकता
“होलिसिटी” ही संकल्पना शहरे केवळ सौंदर्यात्मकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि नागरी व्यवस्थापनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे. या प्रकल्पांतर्गत शहराचा एकात्मिक विकास साधून त्याचे स्मार्ट सिटीच्या पुढील टप्प्यात रूपांतर करता येईल. यात सार्वजनिक वाहतूक, स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग, हरित उर्जेचा वापर, मलनिस्सारण व्यवस्थापन, डिजिटल गव्हर्नन्स, जलसंधारण, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष भर दिला जातो.

