Hingoli police : फ्लिपकार्ट पार्सलचे कंटेनर लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांच्या हिंगोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

508291494 1125095649652016 6699415589567390015 n Hingoli police : फ्लिपकार्ट पार्सलचे कंटेनर लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांच्या हिंगोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हिंगोली| कमी वेळेत पैसा कमवण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्टच्या कंपनीत काम करणाऱ्या तत्कालीन मॅनेजरने फ्लिपकार्टचे पार्सल वाहतूक करणाऱ्या कंटेनर लुटण्याचा प्लॅन आखला. आणि आपल्या साथीदाराला सोबत घेत तो पलायन यशस्वी केला. मात्र हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांच्या आत ८ दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळीत त्यांच्याकडून एक पिकअप, एक कार, दोन मोबाईलसह २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अन्य दोघांचा शोध सुरु असल्याची माहीती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंगोली येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठुबोने उपस्थित होते. कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत भेंडेगाव शिवारात रविवारी दिनांक ११ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कंटेनर अडवून चालक व वाहक यांना मारहाण केली. त्यानंतर कंटेनरमधील पार्सलची पाकिटे एका कारमध्ये टाकून पळविण्यात आली.

या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोरीचा पर्धाफाश करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, रामदास निरदोडे, गजानन बोराटे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, दिलीप मोरे, प्रविण आगलावे, आझम प्यारेवाले, प्रेम चव्हाण, पांडूरंग राठोढड, नितीन गोरे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, हरिभाऊ गंजकर, किशोर सावंत यांच्यासह पोलिसांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने तांत्रिक तपास व गुन्हेगारांची माहिती घेतल्यानंतर कंपनीच्या वाहनाचे जुने चालक नागनाथ राऊत, मारोती भुताडे (रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले.

त्यांनी रिसोड कार्यालयातील माजी व्यवस्थापक सर्वेश धुत याला टीप दिली होती. त्यानंतर आठ जणांनी कंटेनरचा पाठलाग करून लुटल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी ज्ञानेश्वर खानजोडे, परमेश्वर चौधरी, शंकर काळे, मंगेश काटे, मोहमद युसुफ, अभिषेक हलगे, सर्वेश धुत (सर्व रा. रिसोड ), यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून फ्लिपकार्टचे लुटलेले १ हजार २४५ पार्सल व कार, एक पिकअप असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत दोन आरोपींचा शोध वेगवेगळ्या पथकामार्फत सुरु आहे. सदर गुन्हा घडल्यानंतरगुन्हे शाखेने तांत्रिक तपासा सोबतच इतर माहिती घेत ४८ तासांच्या आत गुन्हा उघड केल्याने दहा हजाराचे पारितोषिक जाहीर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top