परभणी| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यातील दैठणा परिसरात विशेष पथकाने कारवाई केली. परभणी-गंगाखेड रोडवरील आंबेटाकळी फाटा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २५ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत १२ लाख ९६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेटाकळी फाटा येथे पत्र्याच्या शेडमध्ये **‘अर्जुन मनोरंजन प्लेईंग कार्ड क्लब’**च्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २९ ऑगस्ट रोजी विशेष पथकाने छापा टाकला.



या कारवाईत पोलिसांनी ५३ हजार ५५० रुपयांची रोकड, २० मोबाईल, एक चारचाकी वाहन आणि ११ मोटारसायकली असा एकूण १२ लाख ९६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात एकूण २५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.



दरम्यान, जुगार अड्ड्यावर तंबाखूजन्य पदार्थही आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३६८/२०२६ अन्वये मुंबई जुगार कायद्यातील कलम ४, ५ व १२(अ), तसेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा, २०२३ मधील कलम ६(ब) व २४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

