हदगाव, शेख चांदपाशा| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी कृषी विभाग व व्यापाऱ्यांना ठणकावून सांगितले की, हदगाव व हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणे उपलब्ध न झाल्यास तसेच बियाणे व खताचा कृत्रिम साठा निर्देशनास आल्यास संबंधित कृषी अधिकारी व व्यापाऱ्यांना जोरदार झटका दिला जाईल. ही बैठक नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (द्वितीय टप्पा – पोखरा) अंतर्गत हदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली अंबाळा या गावाच्या परिसरात हायटेक सभागृहात पार पडली.


या बैठकीत वानखेडे यांनी प्रेमळपणाने पण ठाम शब्दांत इशारा दिला की, जर कोणत्याही व्यापाऱ्याने खताची व बियाणे ची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांकडून जास्त दराने खत विकले, तर त्याची नोंद घेतली जाईल. एवढेच नव्हे तर कोणत्याहीव्यापाऱ्याच्या गोदामात खत साठवलेले आढळून आल्यास ते खत शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली. कृषी सहाय्यकांच्या निष्क्रियतेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून बोगस खत आणि बियाण्याबाबत ठोस कारवाई झाली नाही, यावरून कृषी विभागाची कार्यशैलीच प्रश्नांकित ठरते, असे ते म्हणाले. हदगाव विधानसभा क्षेत्रातील कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करत नाहीत. हे सहाय्यक फक्त शासनाच पगार घेतात, पण प्रत्यक्षात काहीच काम करत नाहीत. असा आरोप त्यांनी केला.


व्यवस्थेतील साठ्यांबाज व भ्रष्टाचारावर गंभीर आरोप..
माजी खा.वानखेडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, जिल्ह्यातील कृषी अधिकारी, तालुका अधिकारी व इतर कर्मचारी हे काही व्यापाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे दिले जाते आणि खत महाग दराने विकले जाते. व्यापाऱ्यांची कधीही गंभीर चौकशी होत नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर फक्त औपचारिक चौकशी करून विषय तिथेच मिटवला जातो ही वास्तुस्थिती आहे.
शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आशा
माजी खा. वानखेडे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे खताची टंचाई दाखवली किंवा शेतकऱ्यांकडून जादा पैसे वसूल केले, तर जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल. योजनांच्या बैठका झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. मात्र दुर्दैवाने अधिकारी केवळ कागदावरच काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.


माजी खासदार शेतकऱ्या करिता आशेची किरण ठरले..
पूर्व खासदार वानखेडे यांनी या बैठकीत केवळ कृषी व्यापाऱ्यांना इशारा दिला नाही, तर कृषी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही कठोर सवाल उपस्थित केले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका घेतली असून, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेची किरण निर्माण झाली आहे.


