नांदेड| जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेअंतर्गत आज ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. गंगथळे आदींची उपस्थिती होती.


ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता संवर्गातील एकूण ३ बदल्या झाल्या असून त्यापैकी एक प्रशासकीय कारणास्तव व २ बदल्या विनंतीवरून करण्यात आल्या. बांधकाम विभागात एकूण १८ बदल्या पार पडल्या असून त्यामध्ये शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता प्रवर्गात प्रशासकीय ४ आणि विनंतीवरून ५ बदल्या, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गात प्रशासकीय ५ तर विनंतीवरून ४ बदल्या करण्यात आल्या आहेत.


ग्रामपंचायत विभागातील विविध संवर्गांमध्ये एकूण ८० बदल्या पार पडल्या. यात विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संवर्गात एकूण ८ बदल्या – प्रशासकीय ५ आणि विनंतीवरून ३, विस्तार अधिकारी (पंचायत) संवर्गात ६ बदल्या झाल्या यात प्रशासकीय २ व विनंतीवरून ४ बदल्या झाल्या. ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात एकूण ६६ बदल्या झाल्या आहेत. यात प्रशासकीय १९ तर विनंतीवरून ४७ बदल्यांचा समावेश आहे.


ही संपूर्ण बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने व पारदर्शकपणे पार पडल्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अमृत शिंदे, सचिव धम्मानंद धोत्रे, मानद अध्यक्ष जय वनसागरे, कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे, कृषी अध्यक्ष सय्यद नजीर, उपाध्यक्ष आनंद शेळके, भास्कर कळणे, जिल्हाध्यक्ष मधुकर मोरे, तुकाराम शिंदे, नारायण काळे, प्रसिद्धी प्रमुख आनंद कदम आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांचे आभार मानून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेअंतर्गत शिक्षण विभागातील उर्वरित केंद्रप्रमुख, अ राजपत्रित मुख्याध्यापक तसेच मराठी व उर्दू माध्यमातील माध्यमिक शिक्षक यांच्या बदली प्रक्रिया 13 मे रोजी पार पडणार आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील उर्वरित आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सहाय्यक पुरुष या दोन संवर्गातील बदली प्रक्रिया 14 मे रोजी पार पडणार आहेत. या दोन्ही दिवशीची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


